शिवथर : येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू असताना कोणतीही एसटी महामंडळाची गाडी थांबत नव्हती. कित्येक वेळा ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने एसटी महामंडळाच्या वाहतूक नियंत्रण शाखा सातारा यांना निवेदन देऊनही कोणतीही दखल घेत नसल्याने मुलांनी व ग्रामस्थांनी चिडून जाऊन रास्ता रोको केला. सातारा तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व एसटी महामंडळाचे अधिकारी यांनी आश्वासन दिल्यावर पूर्ववत वाहतूक सुरू झाली.सातारा-फलटण रस्त्यावर शिवथर, आरफळ, वडुथ आरळे या गावामध्ये एसटी डेपोचे कर्मचारी गाडीमध्ये जागा असूनसुद्धा जाणून-बुजून एसटी बस थांबवत नाहीत. बुधवारी (दि. २७) शिवथर व आरफळ येथील विद्यार्थ्यांचे परीक्षा बुडाले, याला जबाबदार एसटी अधिकारी आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. सकाळी सात वाजल्यापासुन दहा वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रण शाखा परिवहन महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी आलेच नाहीत. त्यांना मुलांच्या परीक्षेचे काही देणे-घेणेच नाही, असाही सवाल संतप्त ग्रामस्थांनी केला.गेली दोन वर्षे ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांनी राज्य परिवहन महामंडळाला लेखी स्वरूपामध्ये जादा गाड्याची मागणी केली आहे. परंतु, परिवहन महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन जुमानले नाही. त्यांना विद्यार्थी व ग्रामस्थांचे काही देणे-घेणेच नाही. जादा एसटी बस मागणी करूनही त्याची दखल घेत नसल्याने शिवथर येथील संतप्त ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला.सातारा-वाठार शटल सेवा सुरू होती; परंतु आता ती बंद असल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन एसटीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ६.३५, ७.४५, ८.५५ या वेळेत जादा गाड्या सुरू केल्या आहेत. रास्ता रोको केल्यानंतर सातारा तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक एच. डी. साठे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, मनोहर फरांदे, सहायक वाहतूक अधीक्षक एन. ए. तांबोळी, एस. व्ही. कदम, व्ही. बी. मोहिते घटनास्थळी उपस्थित होते. (वार्ताहर)
शेकडो विद्यार्थ्यांचा एसटीसाठी रास्ता रोको
By admin | Updated: August 27, 2014 23:31 IST