दहिवडी : ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालकपदाच्या निवडणुकीत सदाशिव पोळ यांचा जो पराभव झाला, तो माण तालुक्यातील काही व्यक्तींमुळे झाला असून, तो पराभव आम्ही स्वीकारला आहे, मात्र यापुढील सर्व निवडणुका शेखर गोरेंच्या नेतृत्वाखाली लढविण्यासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठीच लढविल्या जातील. विरोधकांसह चुकीच्या व्यक्तींना त्यांची जागा दाखवून दिली जाईल,’ असा निर्धार डॉ. संदीप पोळ यांनी व्यक्त केला.गोंदवले बु., ता. माण येथे आयोजित केलेल्या माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेखर गोरे, ज्येष्ठ नेते वाघोजीराव पोळ, जिल्हा परिषद सदस्य सुभाष नरळे, माजी सभापती श्रीराम पाटील, बबन वीरकर, युवराज बनगर, पिंटूशेठ जगताप, अप्पासाहेब पुकळे, तुकाराम भोसले, झुंझारशेठ जाधव, प्रदीप जाधव, मामूशेठ वीरकर, आनंदा कुंभार, राजेंद्र जाधव, भरतेश गांधी उपस्थित होते.डॉ. पोळ म्हणाले, ‘पोळतात्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून उमेदवारी दिली गेली. शेखर गोरे यांनी पक्षीय राजकारणाचा विचार न करता निरपेक्ष भावनेने मदत करून पोळतात्यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. मात्र, राष्ट्रवादीच्या काहीजणांनी निवडणुकीत चुकी केल्यामुळे अल्पशा मताने पराभव स्वीकारावा लागला.’शेखर गोरे म्हणाले, ‘जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी पोळतात्यांना शब्द दिला होता. तो अखेरपर्यंत पाळला; परंतु मी किंगमेकरला निवडून आणले तर मीच किंगमेकर होईन, या भीतीपोटी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेतेमंडळींनी ठाम भूमिका घेतली नाही. तसेच राष्ट्रवादीच्या काहींनी चुकी केली. त्यामुळे तात्यांचा पराभव झाला.’ (प्रतिनिधी)
काही व्यक्तींमुळेच जिल्हा बँकेत पराभव : पोळ
By admin | Updated: August 10, 2015 21:14 IST