प्रशासनाची मोहीम : १ फेब्रुवारीपासून प्रारंभ; एकत्रित नावे असणाऱ्या कुटुंबांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ज्या कुटुंबांचे उत्पन्न एक लाखांवर आहे अशांच्या शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही मोहीम १ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, अनेक शिधापत्रिकाधारकांना याचा फटका बसणार आहे.
सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना रेशनवर मिळणाऱ्या धान्यावर गुजराण करणारे अनेक लोक आहेत. अनेकांच्या शिधापत्रिकांमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे आहेत. अनेकांनी अशा शिधापत्रिका वेगळ्या केलेल्या नाहीत तसेच शासनाकडूनही नव्याने शिधापत्रिका मिळत नसल्यामुळे अनेकांची नावे जुन्यात शिधापत्रिकेत राहिलेली आहेत. साहजिकच जे लोक रेशनच्या धान्यावर अवलंबून आहेत, असे लोक धान्य उचलतात आणि आपले पोट भरतात. मात्र, आता शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आधारकार्ड लिंक करून कुटुंबातील सदस्यांचे बोटाचे ठसेदेखील देण्यात आलेले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आधारकार्ड लिंक केलेले असल्याने याद्वारे कुटुंबाचे उत्पन्न समजणार आहे.
वास्तविक, या मोहिमेमुळे शिधापत्रिकेत एकत्रित कुटुंबाची नोंदणी असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना मोठा फटका बसणार आहे. शासनाने स्वतंत्र शिधापत्रिका देऊन गरजूंना धान्यापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी होत आहे.
एकूण शिधापत्रिकाधारक : ७ लाख १९ हजार १३४
पिवळे शिधापत्रिकाधारक : २८,५००
अंत्योदय कार्डधारक : ३ लाख ८६ हजार
केशरी कार्डधारक : २ लाख ४६ हजार ७७५
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती
एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा शोध जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीतर्फे घेतला जात आहे. या शोध मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती यावर देखरेख करणार आहे.
हे पुरावे आवश्यक...
रेशनवरून धान्य मिळण्यासाठी अल्प उत्पन्न गटातील व्यक्तिंना प्राधान्य आहे. त्यासाठी तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. आधारकार्ड बँकेला लिंक असल्याने तपासणीमध्ये कुटुंबाचे उत्पन्न समजणार आहे.
या कारणाने रेशनकार्ड रद्द होणार
कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असेल, निवृत्तीवेतनधारक असेल, कुटुंबाचे उत्पन्न एक लाखांच्या वर असेल तर शिधापत्रिका रद्द होणार आहे.
कोट
जे ग्राहक शिधापत्रिका अनेक दिवसांपासून वापरत नाहीत अथवा त्या ठिकाणाहून धान्य घेतले जात नाही, अशा शिधापत्रिका बंद केल्या जात आहेत. ज्या लोकांना रेशनची खऱ्या अर्थाने गरज आहे, अशा कुटुंबांना लाभ देण्यात येत आहे.
- स्नेहा किसवे-देवकाते
जिल्हा पुरवठा अधिकारी