कोपर्डे हवेली येथे रेल्वे फाटक क्रमांक ९६ मधील रुळाची दुरुस्ती, खडीकरण, भरावा, आदी कारणांसाठी गुरुवारी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास रेल्वे गेट बंद करण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून नजीकच्या ग्रामपंचायती, पोलीस ठाणे, कारखाने, प्रसारमाध्यमे यांना याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, सर्वांना माहिती नसल्याने अनेक वाहन चालकांची फसगत झाली. पर्यायी व्यवस्था म्हणून काही वाहनधारकांनी धुरूंगमळा ते उत्तर कोपर्डे मार्गाचा वापर केला. परंतु, अरुंद रस्ता, रेल्वे बोगदा व एकेरी वाहतूक असल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांना किरकोळ वादावादीच्या प्रसंगांना सामोर जावे लागले.
वाहतुकीचा पल्ला वाढून वाहनांच्याही वर्दळीचा त्रास सोसावा लागला. वळणावर फलक नसल्याने वाहनधारकांची दिशाभूल झाली. त्यातच कारखाना सुरू असल्याने उसाची वाहतूक करणाऱ्या बैलगाड्याही याच रस्त्याचा वापर करीत असल्याने आधीच परवड झालेल्यांना आणखी मनस्ताप सोसावा लागला. रात्रीपर्यंत रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
- चौकट
नजीकच्या गावांना नाहक त्रास
कोपर्डे हवेली येथे अनेकदा खडीकरण, रुळाचे काम, वेगवेगळ्या दुरुस्तीमुळे गेट बंद ठेवण्यात येते. परिणामी, पर्यायी मार्ग म्हणून वाहनांच्या वर्दळीचा त्रास उत्तर कोपर्डे, नडशी कॉलनी, शिरवडे स्टेशन, कोपर्डे हवेली परिसरातील स्थानिकांना होतो. पर्यायी रस्ता म्हणून धुरूंगमळा ते नडशी रेल्वे पुलाच्या मार्गाचा वापर केला जातो. परिणामी, शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी वाहनांची ने आण करता येत नाही. जवळपास असलेल्या गावांना दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण होतात.
फोटो : ०४केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाड-मसूर रस्त्यावरील कोपर्डे हवेलीतील रेल्वे फाटक गुरुवारी बंद ठेवण्यात आल्याने पर्यायी कच्च्या रस्त्याने वाहतूक सुरू होती. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. (छाया : शंकर पोळ)