सागर गुजर-सातारा -फलटणचे संस्थानिक रामराजे नाईक-निंबाळकर आणि साताऱ्याचे संस्थानिक खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील ‘पॉलिटिकल गेम’ अद्यापही संपुष्टात आलेला नाही. एकाच पक्षाच्या या दोन मातब्बर नेत्यांमधील वाक्युद्धाला जरी अल्पविराम मिळालेला असला तरी जिल्हा बँकेच्या सारिपाटावर मात्र या दोघांनीही एकमेकांना ‘चेक’ देऊन ठेवला असून, सध्याच्या परिस्थितीत खेळातील स्थिती जैसे थे आहे. या खेळातील रंगत येत्या २४ एप्रिलनंतरच पुन्हा एकदा पाहायला मिळेल, असे सध्याचे चित्र आहे.जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासून खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता. फलटणच्या पाण्याच्या निमित्ताने उदयनराजेंच्या माध्यमातून फलटणमधील काँगे्रसच्या नेत्यांनी या संघर्षाची वात पेटवली. ही आग भडकायला श्रीराम कारखान्याचे रण कारणीभूत ठरले. दोघांच्यातील संघर्ष ज्या कारणासाठी होता, त्या जिल्हा बँकेतही हा ‘पॉलिटिकल गेम’ सुरू राहणार, हे आधीच स्पष्ट झाले होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातून सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या पारंपरिक गृहनिर्माण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे या दोघांची समोरासमोर लढत होणार नाही, हे स्पष्ट होत असले तरी दोघांनीही एकमेकांचे निकटवर्तीय उमेदवार एकमेकांविरोधात उभे करून ‘राजकीय मेख’ मारून ठेवली आहे.फलटणमध्ये रामराजे गटाचे कट्टर विरोधक असलेले माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे वाखरी, ता. फलटण येथील निकटवर्ती व तालुका काँगे्रसचे माजी उपाध्यक्ष तुकाराम बापू शिंदे यांनी फलटण सोसायटी मतदारसंघातून रामराजेंविरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे. तर साखरवाडी, ता. फलटण येथील रामराजे गटाचे ज्ञानेश्वर कोंडिबा पवार यांचा अर्ज गृहनिर्माण सहकारी संस्था या मतदारसंघामध्ये उदयनराजे भोसले यांच्याविरोधात भरला आहे. तुकाराम शिंदे आणि ज्ञानेश्वर पवार या दोघांचे उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. त्यातच उदयनराजे यांच्या समर्थक असणाऱ्या गीतांजली कदम यांच्याविरोधात महिला राखीव गटातून रामराजे गटाच्या कौसल्या ज्ञानेश्वर पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही राजकीय खेळी रामराजे व उदयनराजे या दोघांनीही एकाचवेळी खेळली आहे. त्यामुळे बुद्धिबळाच्या पटात ज्याप्रमाणे समोरासमोरील खेळाडूंच्या राजाला चेक बसल्यास हालचाल करण्यास मिळत नाही, तीच परिस्थिती या दोघांची आहे. या दोन्ही राजेंना चक्क प्याद्यांनी चेक दिलाय. त्यामुळे खेळ थांबलेला दिसत असला तरी अंतर्गत खेळ्या सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते पुढाकार घेतील!जिल्हा बँक निवडणुकीत जास्तीत जास्त जागा बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीतून हालचाली सुरू झाल्या आहेत. रामराजे व उदयनराजे यांच्यातील संघर्षात न पडलेले राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेच आता बँक ताब्यात ठेवण्याच्या हेतूने या दोन राजेंमधील संघर्ष थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तसा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही दिला असून, कदाचित २२ एप्रिलच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे....तर संघर्ष अटळअर्ज मागे घेण्यासाठी २४ एप्रिलपर्यंत मुदत आहे. अजून १४ दिवसांच्या कालावधीत हा चेक काढण्यासाठी दोघांनाही प्यादी मागे घ्यावी लागतील. मात्र, प्यादी मागे न घेता दोघांनीही एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर संघर्ष अटळ ठरणार आहे.
राजेंमध्ये ‘पॉलिटिकल गेम’ सुरूच!
By admin | Updated: April 10, 2015 01:05 IST