सातारा : समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांचे वैयक्तिक आयुष्य किती खडतर आहे, याची प्रचिती त्यांच्या वसाहतीमधील राहणीमान आणि त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून आली. वसाहतीच्या आजूबाजूला प्रचंड गवत, मोडकळीस आलेली इमारत, अशी न राहण्यासारखी परिस्थिती असतानाही पोलिसांची कुटुंबे त्याच ठिकाणी वास्तव्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्हा पोलीस दलासाठी केवळ शहरामध्ये तीन वसाहती आहेत. त्यातील एक वसाहत पाडण्यात आली असून, या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येत आहे. तब्बल ६९८ जणांची राहण्याची सोय या इमारतीमध्ये केली जाणार आहे. परंतु अद्यापही गोडोली गोळीबार मैदान आणि सिटी लाइन पोलीस वसाहत या दोनच वसाहतीमध्ये सध्या पोलीस कर्मचारी वास्तव्यास आहेत. अत्यंत दयनीय अवस्था याही वसाहतींची झाली आहे. उघड्यावर गटर, अंगणात दगडगोटे, वर पत्रा, आजूबाजूला गवत, अशी परिस्थिती असतानाही अनेक कुटुंबे निमुटपणे या वसाहतीमध्ये वास्तव्य करत आहेत. विशेष म्हणजे या वसाहती राहण्यायोग्य नाहीत, असा अहवाल बांधकाम विभागाने दिला आहे. मात्र, तरीही पोलीस आपली ड्यूटी बजावून दिवस काढत आहेत. पण यंत्रणेच्या विरोधात कुटुंबीयही बोलायला तयार नाहीत. आमचे नाव घेऊ नका आणि फोटोही छापू नका, असे पोलिसांची कुटुंबीय सांगत होते. पोलिसांच्या वसाहतीमध्ये बऱ्याच खोल्या रिकाम्या दिसून येत आहेत. बाहेर भाड्याने राहणे अनेकजण पसंत करत आहेत. पण पोलीस वसाहतीमध्ये राहात नाहीत.
चौकट : जिल्ह्यातील पोलीस
३९००
चौकट : शासकीय घरे मिळालेली
२६८
चौकट : ड्यूटी किती तासांची
तसं पाहिलं तर कागदावर आठ तास ड्यूटी असली तरी प्रत्यक्षात पोलिसांना दहा ते बारा तास काम करावे लागते. त्यामुळे ना कुटुंबीयांना त्यांना वेळ देता येतो ना मुलांना उच्चशिक्षण देता येते.
चौकट : कुटुंबासाठी किती वेळ
ड्यूटी करून घरी आल्यानंतर शरीर थकलेलं असतं. कधी विश्रांती घेतोय, असं त्यांना वाटू लागतं. सकाळी उठून पुन्हा ड्यूटीवर जातात. त्यामुळे कुटुंबाला केवळ एक ते दोन तास दिले जातात.
चौकट : मुलांचे शिक्षण कसे
मुलांचे शिक्षण पूर्ण करताना पोलिसांच्या नाकेनऊ येते. पगाराची ओढाताण होते. घरातला खर्चही भागवावा लागतो. अशी परिस्थिती असल्यामुळे पोलिसांची मुले शक्यतो पोलीस खात्यात येत नाहीत. पण त्यांना अधिकारी व्हावंस वाटतं. अनेक मुलांचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न आहे. पण खर्चाअभावी ते पूर्ण होईल का नाही, याची शंकाही त्यांना वाटते.
चौकट : स्वत:चे घर आहे का
अनेक पोलिसांना स्वत:ची घरे नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव ही कुटुंबे मोडकळीस आलेल्या वसाहतीमध्ये राहात आहेत. काहींना घरे आहेत. अशी लोक स्वत:च्या घरात राहण्यासाठी गेले आहेत. पण त्यांना वेळेत घरभाडे मिळत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या.
कोट : दोन वर्षे आम्ही पोलीस वसाहतीमध्ये राहात होतो. प्रचंड दुरवस्था आणि सोयी नसतानाही आम्ही तेथे राहिलो. त्यानंतर आम्ही स्वत:चं घर घेतलं. तेथे शिफ्ट झाल्यानंतर आम्हाला घरभाडं देणे गरजेचे होते. पण अनेक महिने घरभांड मिळतच नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कुटुंबाच्या व्यथा जाणून घ्यायला हव्यात.
-एक पोलीस पत्नी
फोटो : ०५ जावेद खान