संजय पाटील -कऱ्हाड -कऱ्हाडात काही महिन्यांपूर्वी २९ लाखांच्या बनावट नोटांचं घबाड पोलिसांच्या हाती लागलं. त्यावेळी कऱ्हाडसह जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक, आर्थिक संस्था व सामान्य नागरिकही हडबडले. बनावट नोटा चलनात आल्याच्या भीतीने त्यावेळी सर्वांचीच पाचावर धारण बसली. कालांतराने हे प्रकरण विस्मृतीत गेले; पण चार दिवसांपूर्वी साताऱ्यात साडेपाच लाखांच्या बनावट नोटा आढळल्याने पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हजार, पाचशेची नोट संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, प्रत्येक नोट तपासूनच खिशात घातली जात आहे. बनावट नोटांचे जिल्ह्याशी ‘कनेक्शन’ तसं नवीन नाही; पण आजपर्यंत ज्या-ज्यावेळी अशी प्रकरण चव्हाट्यावर आली त्या-त्यावेळी फक्त एजंट पोलिसांच्या जाळ्यात सापडले़ साखळी शोधताना काही कड्याच पोलिसांच्या हाती लागल्या़ मुख्य सूत्रधार दूरच; पण दलालांपर्यंतही पोलीस पोहोचू शकलेले नाहीत़ २००५ साली कऱ्हाडात बनावट नोटांचे मोठे ‘रॅकेट’ उघडकीस आले होते़ त्यामध्ये अनेकांना अटक झाली होती़ ‘व्हाईट कॉलर’च्या सहभागामुळे त्यावेळी त्या प्रकरणाचा मोठा गाजावाजाही झाला होता; पण कालांतराने ते प्रकरण विस्मृतीत गेले़ त्यानंतर अनेकवेळा बनावट नोटांच्या लहान-मोठ्या कारवाया झाल्या़ कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी मुरलीधर मुळूक कार्यरत असताना आॅगस्ट २०१२ मध्ये बनावट नोटांचे एक प्रकरण उघडकीस आले होते़ शहरातील मुख्य बाजारपेठेत काहीजण बनावट नोटा खपविण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली होती़ त्यांच्याकडे तपास केला असता, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी पश्चिम बंगालमधील असल्याचे व कमिशनच्या मोबादल्यात ते बनावट नोटा खपविण्यासाठी कऱ्हाडात आल्याचे निष्पन्न झाले; पण पुढे या प्रकरणाचा तपास ढेपाळला़ निरीक्षक मुळूक यांच्याच कालावधीत बनावट नोटांचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला़ बसस्थानकानजीक फळविक्रेत्यांकडे बनावट नोटा खपविण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्याच्याकडे तीस हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्या़ संबंधित मुलगा मुंबईतून फक्त नोटा खपविण्यासाठी कऱ्हाडात आला होता़ २००५ नंतर कऱ्हाडसह जिल्ह्यात बनावट नोटांचे मोठे प्रकरण उघडकीस आले नव्हते. त्यामुळे नागरिकांनीही छोट्या-मोठ्या घटना गांभीर्याने घेतल्या नाहीत. मात्र, काही महिन्यांपूर्वी कऱ्हाडच्या पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी केलेल्या कारवाईत तब्बल २९ लाखांच्या बनावट नोटा पोलिसांच्या हाती लागल्या. बनावट नोटांचा एवढा मोठा साठा शहरात आढळल्यानंतर साहजिकच काही नोटा चलनात आल्याच्या शक्यतेने आर्थिक संस्था तसेच व्यापाऱ्यांमध्येही चुळबूळ सुरू झाली़ आपल्याकडील नोटांची काही आर्थिक संस्था तसेच व्यापाऱ्यांनी खातरजमा करून घेतली़. कालांतराने ही घटना लोक विसरले होते. अशातच साताऱ्यात साडेपाच लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्याने हजार, पाचशेच्या नोटा पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. व्यापारी, व्यावसायिक तसेच सामान्य नागरिकही हजार, पाचशेची नोट तपासून मगच खिशात घालत आहेत. ‘अडनाव’ किंवा ‘पडनाव’ हीच ओळखबनावट नोटांचे रॅकेट दलालांकरवी ‘आडनाव’ किंवा ‘पडनावा’च्या ओळखीवर चालविले जात असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे़बनावट नोटा परप्रांतातून आणल्या जात असल्याचे यापूर्वीच्या गुन्ह्यातून उघडकीस आले आहे़ मात्र, त्या कोणत्या मार्गाने व कशा आणल्या जातात, याची उकल अद्यापही झालेली नाही़ साखळीतील व्यक्तींना एकमेकांची नावे व पत्ते माहिती नसतात. कधी-कधी त्यांनी एकमेकांना पाहिलेलेही नसते. त्यामुळे एक कडी हाताला लागली तरी त्याच्या माध्यमातून पुढच्या कडीपर्यंत पोहोचता येईल की नाही, याबाबत पोलीसच संभ्रमात असतात.पैसा बोलता है !बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनामध्ये आणल्या जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने बनावट नोटा ओळखण्यासाठी इंटरनेटवर एक संकेतस्थळ सुरू केले आहे़ ‘पैसा बोलता है’ या नावाने सुरू केलेल्या या संकेतस्थळावर बनावट नोटा ओळखण्याच्या सर्व क्लृप्त्या दिल्या आहेत़लाखाच्या बदल्यात तीस हजारबनावट नोटांचे वितरण कमिशनच्या मोबदल्यात होत असल्याचे वेळोवेळी उघडकीस आलेल्या प्रकरणांतून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये प्रत्येक टोळीच्या कमिशनचा आकडा वेगवेगळा आहे. कऱ्हाडात यापूर्वी पकडण्यात आलेल्या टोळीतील एजंटांना लाखाच्या बनावट नोटा खपविल्यास पन्नास हजार रुपये मिळत असल्याचे उघडकीस आले होते. तर सातारा येथे पकडलेल्या टोळीतील एजंटांना लाखाच्या मोबदल्यात तीस हजार रुपये मिळत होते, असे पोलिसांनी सांगितले.
पैसा पुन्हा झाला खोटा !
By admin | Updated: December 2, 2014 00:25 IST