कऱ्हाड : पुणे जिल्ह्यातील टोलनाक्यांवर जिल्ह्यातील स्थानिकांना टोलमध्ये सूट दिली आहे. मग सातारा जिल्ह्यातील स्थानिकांना सूट का नाही? असा सवाल करीत एमएच. ५० व एमएच ११ पासिंग असणाऱ्या स्थानिकांना टोलमध्ये सूट द्यावी, अन्यथा ९ सप्टेंबर रोजी आनेवाडी टोलनाका बंद पाडणार असल्याचा इशारा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी दिला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी आप्पासाहेब गायकवाड, अशोक मदने, नीलेश गाडे, युवराज काटरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, ‘आपला प्रवास सुरक्षित व्हावा, आपला वेळ व इंधनाची बचत व्हावी, तसेच आपल्या वाहनांचे नुकसान होऊ नये यासाठी टोल भरला जातो. असे असताना यापैकी कोणतीच सेवा आपल्याला सद्य:स्थितीत मिळत नाही. आज जिल्ह्यातील महामार्गाचे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार घडत आहेत. रस्ते खराब असल्याने वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे. तसेच अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात आहेत. असे असताना आपण टोल का द्यायचा.
आज पुणे जिल्ह्यातील टोलनाक्यांवर जिल्ह्यातील स्थानिकांना टोलमध्ये सूट दिली आहे. मग सातारा जिल्ह्यातील स्थानिकांना सूट का नाही? एम. एच. ५० व एम. एच. ११ पासिंग असणाऱ्या स्थानिकांना टोलमध्ये सूट द्यावी. महामार्गालगत सेवारस्त्यांना लागूनच गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यामुळेही भविष्यात गॅस लिकेज होऊन अपघाताचा धोका संभवतो. अशा परिस्थितीत शासन आणि ठेकेदार प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी घेणार आहेत काय? रस्त्यांबाबत प्रशासन, जिल्हाधिकारी हतबल आहे. त्यांना जागे करण्यासाठीच आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत आहे. याबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाने ठेकेदार आणि जनता यांच्यात जनतासभा घ्यावी. त्यातून प्रवाशांच्या व स्थानिकांच्या समस्या समजून निर्णय घ्यावा. मात्र, जिल्हाधिकारी जाणूनबुजून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. .
दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा आदेश आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. एकीकडे राज्य शासन तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवित आहे, तर उच्च न्यायालयाने तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजना करण्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. तिसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केले तर त्यासाठी उपाययोजना कशा करणार. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांविना कोरोना सेंटर चालणार कशी? असे असताना जिल्हा प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. कोरोनाबाधितांचा श्वास बंद करण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे. असे झाल्यास जिल्हाधिकारी यांच्या दारात आंदोलन करून त्यांचाही श्वास कोंडण्याची परिस्थिती आम्ही निर्माण करू, असाही इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
चौकट :
टोलविरोधी आंदोलनाची भाषा जिल्ह्यातील इतर नेते करीत आहेत. मात्र, त्यांनी आंदोलनाची तारीख अद्याप स्पष्ट केली जात नाही. टोलमुक्ती सगळ्यांना हवी आहे. मात्र, पुढे यायला कोणी नाही. ते पुढे आले असते तर त्यांना आम्ही पाठिंबा दिला असता. परंतु, त्यांची तारीख स्पष्ट होत नसल्याने आम्ही पुढाकार घेऊन येत्या ९ सप्टेंबर रोजी आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करून टोलनाका बंद पाडणार आहोत.