सांगली : रात्रीची गस्त घालताना त्याबाबतची आगाऊ माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना द्यावी, अन्यथा हत्यारासह फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, गेल्या महिन्याभरापासून महामार्ग, वाळवा, सांगली, मिरज व इतर ग्रामीण भागात चोरांच्या परप्रांतीयांच्या टोळ्या कार्यरत असल्याच्या अफवा जोरदार पसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी व युवकांनी स्वत:हून रात्रगस्त सुुरू केली आहे. गस्त घालीत असताना युवकांमधील काहीजणांनी स्वत:च वाटमाऱ्या करून चोऱ्या केल्याचे व हुल्लडबाजी करून निरपराध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. मारहाण करणे, घरावर दगडफेक करणे आदी प्रकार उघडकीस आले आहेत. अशा उपद्रवी लोकांवर इस्लामपूर, विश्रामबाग, सांगली ग्रामीण व आष्टा पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित गावातील लोकांनी, युवकांनी गस्त घालत असताना त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात याची आगाऊ माहिती देणे आवश्यक आहे. हुल्लडबाजी न करता अफवा न पसरवता गस्त घालावी, यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात यावी. रात्री गस्त घालण्यासाठी आता राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात करण्यात आलेली आहे. यावर पोलीस निरीक्षक, विभागीय पोलीस अधिकारी यावर देखरेख करणार आहेत. सोशल मीडियावरून अफवा पसरवल्या जात असूून, याबाबतही सर्वांनी दक्षता घ्यावी. यासंदर्भात अनेकांना नोटिसाही पाठविण्यात आल्या आहेत. यापुढेही सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. ज्यांना गस्त घालायची आहे, त्यांनी आपली नावे पोलीस ठाण्याला द्यावीत. त्यामधील काहीजणांची ग्राम सुरक्षा दलामध्ये नियुक्ती करण्यात येईल. त्यांच्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड, बजरंग बनसोडे यांनी दिली. (प्रतिनिधी) आता लाचखोरांच्या साहेबांचीही चौकशी! यापुढे पोलीस ठाणे अथवा शाखेतील कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाल्यास संबंधित विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यास जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. अर्थात तत्पूर्वी याची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्याच्या अधिन राहूनच कनिष्ठ अधिकारी कर्मचारी काम करीत असतात. त्यांच्याकडे प्रलंतबत असणारे अर्ज, तपासावरील गुन्हे, इतर प्रकरणे यांची नियमित दफ्तर तपासणी वरिष्ठ घेत नाहीत. कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत नाहीत. नेमून दिलेले काम कनिष्ठ कर्मचारी करतात की नाही, याची खातरजमाही अधिकारी करतान दिसत नाहीत. त्यामुळे कर्मचारी लाचखोरीस प्रवृत्त होतात व त्यांना यासाठी वाव मिळतो. यामुळे पोलीस दलाची बदनामी होऊन पोलिसांकडे पाहण्याचा संशय बळावतो. हे टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी कनिष्ठांवर देखरेख ठेवली पाहिजे. यामध्ये त्यांचीही जबाबदारी असते. यापुढे कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी लाचखोरीमध्ये सापडल्यास संबंधितांच्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. तत्पूर्वी प्रभारींच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात येईल.
पोलिसांना गस्तीची माहिती देणे सक्तीचे
By admin | Updated: August 6, 2015 00:47 IST