सातारा : शाहूपुरी परिसरातील अनेक ठिकाणचे विद्युत ट्रान्स्फार्मर उघड्या अवस्थेत होते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका होता. ही बाब भारत भोसले यांच्या नेतृत्वाखाली शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने साताऱ्यातील प्रतापगंज पेठ कार्यालयातील वीज कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र माने यांनी पथकासह जाऊन पाहणी करायला लावली तसेच सर्व अडचणी दूर करण्याची ग्वाही दिली.
याबाबत माहिती अशी की, शाहूपुरी परिसरातील झाडाने व्यापलेल्या वीजतारा, जयविजय कॉलनी परिसरात नवीन डीपी बसवूनही लोकांना टीव्ही, फ्रीज बंद पडत आहेत. गंगासागर भागात लाईटचा प्रकाशही मंद असतो, बोअरवेल चालत नाहीत, ऐन उन्हाळ्यात पंखे चालू होतं नाहीत अशा नागरिकांच्या परिसरात भेट देऊन त्यांचेशी चर्चा केली. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना उचित कार्यवाहीच्या सूचना दिल्या. धर्मवीर संभाजीनगर परिसर व आझादनगर- गंगासागर कॉलनी परिसरासाठी नव्याने मंजूर असलेल्या डीपीचे कामही काही दिवसांत पूर्ण होईल, असे माने यांनी सांगितले.