पसरणी : ‘शिक्षकांच्या अचूक मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीची दिशा गवसते. गुणवत्ता व दर्जामुळे वाई पालिकेच्या शाळांतील विद्यार्थी संख्या टिकून, वाढत आहे,’ असे गौरवोद्गार राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी काढले.
नगरपालिका आयोजित शिक्षक व गुणवत्ताधारक विद्यार्थी गौरव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक भारत खामकर, रेश्मा जायगुडे, प्रदीप जायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगराध्यक्ष अनिल सावंत म्हणाले, ‘कोरोना काळात शिक्षकांना अनेक आरोग्यविषयक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या तरी गुणवत्तेकडे त्यांनी दुर्लक्ष होऊ दिले नाही. विद्यार्थ्यांत तुम्ही कोणीतरी बनू शकता, असा आशावाद शिक्षकच जागवू शकतात. इंग्रजी संभाषण कौशल्य विकासासाठी पुढाकाराचे आवाहन त्यांनी केले. आमदार मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वाई पालिका शाळा क्र. १ व ४ च्या इमारतींसाठी निधी उपलब्ध झाला असून, लवकरच बांधकामास सुरुवात होईल.’
गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी म्हणाले,’ शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत वाईतील पाच विद्यार्थी चमकले. या परीक्षेत शहरातील ८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात वाई तालुका राज्यात तिसरा आहे, हे अभिमानास्पद आहे. प्रज्ञाशोध, नवोदय, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.’
नगरसेवक चरण गायकवाड, सुजाता यादव, सुनंदा खराडे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रशासनाधिकारी साईनाथ वाळेकर यांनी प्रास्ताविक केले. सारिका खांडके, तृप्ती शेलार यांनी सूत्रसंचालन केले. संगीता अरगडे यांनी आभार मानले. आदर्श शिक्षक पुरस्काराने सुजाता यादव, सुनंदा खराडे, सुरेखा खामकर यांना गौरविण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्तीबद्दल पुष्पलता बुलंगे यांचा सत्कार करण्यात आला.