वाई : कोरोनाचा कहर वाढला असून अनेक रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनची कमी जाणवत असून, उपलब्ध रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात राज्यासह देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे.
वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ही लक्षणीय वाढत आहे, तसेच राज्यात काही जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच विषाणूचा नवीन आलेला ट्रेंड यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून सोयी-सुविधा वाढविल्या जात आहेत. वाई येथील किसन वीर महाविद्यालयातील मुलांचे हॉस्टेल व मुलींचे हॉस्टेलमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून वाई तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण यांच्यासाठी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोरोना केअर सेंटरची एकूण क्षमता १५० रुग्णांची असून सद्यस्थितीत ५० रुग्णांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे, तसेच आवश्यकतेनुसार ही क्षमता वाढवण्यात येणार आहे. या कोरोना केअर सेंटरमध्ये वाई तालुक्यातील होम क्वारंटाईनची सुविधा नसलेले, तसेच ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांची निवास, भोजन, तसेच उपचाराची व्यवस्था होणार आहे. या सेंटरचे प्रमुख म्हणून डॉ. देवेंद्र यादव हे काम पाहणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी संगीता राजापूरकर व तहसीलदार रणजित भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी दिली.