कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती २० एप्रिल रोजी साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त हिंदू एकता आंदोलनच्या वतीने कऱ्हाडात तीन दिवस शिवजयंती साजरी केली जाणार असून, विविध चित्ररथांच्या माध्यमातून दरबार मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती हिंदू एकता आंदोलनाचे प्रांतिक अध्यक्ष विनायक पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भूषण जगताप, राहुल यादव, रूपेश मुळे, चंद्रकांत काढवे, बाळासाहेब कलबुर्गी आदी उपस्थित होते.विनायक पावसकर म्हणाले, ‘शिवजयंतीनिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, दि. १९ सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची चावडी चौक येथे प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सोमवारी २० रोजी सकाळी आठ वाजता तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना व सजावटीचे परीक्षण करण्यात येणार आहे. मंगळवारी २१ रोजी सायंकाळी पाच वाजता सोमवार पेठ येथून पांढरीचा मारुती मंदिर, मंगळवार पेठे ते दत्त चौक मार्गे दरबार मिरवणूक काढली जाणार आहेत. यामध्ये परिसरातील गावांतून मोठ्या प्रमाणात चित्ररथांचा समावेश करण्यात येणार आहे.’ ही दरबार मिरवणूक पूर्णपणे ऐतिहासिक असणार आहे. कऱ्हाडनंतर दुसरी मोठी दरबार मिरवणूक ही मलकापूरमध्ये काढण्यात येणार आहे. ढोल, ताशांसह घोड्यांच्या ताफ्याच्या माध्यमातून किर्लोस्कर कंपनीपासून ते ढेबेवाडी फाटापर्यंत ही मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकीमध्ये पाच पुरस्कार काढण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष राहुल यादव यांनी दिली. (प्रतिनिधी)
कऱ्हाडात निघणार ऐतिहासिक दरबार मिरवणूक
By admin | Updated: April 7, 2015 01:12 IST