सागर गुजर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन होऊन त्यामधून वाहतूक सुरु झाली आहे. आता हा ग्रेड सेपरेटर देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी सातारा पालिकेकडे हस्तांतरित केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा नगरपालिकेला याबाबतचे पत्र दिले आहे.
येथील पोवई नाका परिसरात सात रस्ते एकत्र येतात. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या साताऱ्यात विविध कामानिमित्त वाहने घेऊन येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाका परिसरात नेहमीच वाहनांची मोठी गर्दी असते. कोल्हापूर, पंढरपूर, सांगली, सोलापूर, बारामतीकडून येणारी वाहने पोवई नाका ओलांडून मगच सातारा शहरात किंवा बसस्थानकाकडे जात होती. यामुळे पोवई नाक्यावर वाहनांची कोंडी होताना दिसत होती. त्या पार्श्वभूमीवर पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय होऊन हा प्रकल्प अस्तित्वात आला आहे.
आता ग्रेड सेपरेटरमधून वाहनांची ये-जा वाढली आहे. सातारा शहरातून पुणे, महाबळेश्वर, महाडकडे जाणारी वाहने तसेच शहराबाहेरुन बसस्थानकमार्गे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पंढरपूर, बेळगावकडे जाणारी वाहने आता ग्रेड सेपरेटरचा वापर करत असल्याने पोवई नाका येथील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. या ग्रेड सेपरेटरच्या देखभालीचा मोठा प्रश्न आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हा ग्रेड सेपरेटर बांधला गेला. आता सुरक्षेच्या दृष्टीने त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, वाहतूक सुरळीत व अपघातविरहीत होण्यासाठी रस्ता, ग्रेड सेपरेटरच्या भिंती, स्लॅब यांची करावी लागणारी दुरुस्ती ही पालिकेला करावी लागणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत सातारा पालिकेला पत्र दिले आहे. सोमवारी (दि. ८ फेब्रुवारी) सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिका प्रशासनातर्फे संयुक्तपणे ग्रेड सेपरेटरची पाहणी व तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर ग्रेड सेपरेटरच्या हस्तांतरणाचे सोपस्कार पूर्ण होतील.
कोट..
सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झालेले आहे. आता या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी सातारा पालिकेची राहणार आहे. त्याबाबतचे पत्र पालिकेला देण्यात आलेले आहे.
- राहुल अहिरे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
कोट...
सार्वजनिक बांधकामतर्फे ग्रेड सेपरेटर हस्तांतरित करुन घेण्याचे पत्र पालिकेला मिळाले आहे. या कामाची पाहणी करुन मगच हा प्रकल्प सातारा पालिका ताब्यात घेणार आहे.
- अभिजीत बापट, मुख्याधिकारी
चौकट..
दोनवेळा झाले होते उद्घाटन
ग्रेड सेपरेटरचे वैशिष्टयपूर्ण असे काम पूर्ण झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पालिका पदाधिकाऱ्यांनी उद्घाटन केल्यानंतर यामध्ये वाहतूक सुरु झाली होती. त्यानंतर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासनानेही उद्घाटनाचा कार्यक्रम केला होता.
फोटो : जावेद खान