गावप्रदक्षिणा घालून करुणा भाकण्यास प्रारंभ संजय कदम ल्ल वाठार स्टेशन जून संपला, जुलै आला, खरिपाच्या पेरण्याही रखडल्या... आभाळात कुठं ढग ही दिसेना... दुष्काळाच्या गडद छायेत आता सर्वत्रच शांतता पसरलीय. गावागावांत पारावरही आता ज्येष्ठ माणसं केवळ पावसाच्याच गप्पा मारताना दिसत आहेत, तर गावातील काही शाळकरी पोरं मात्र सायंकाळी धोंडीला गावप्रदक्षिणा घालून पावसासाठी साद घालताना दिसत आहेत. जून महिना सुरू होताच खऱ्या अर्थाने खरीप हंगामाच्या पेरण्यांची लगबग सुरू होते. यापूर्वी मशागती करून शेतकरी या महिन्यात सुरू होणाऱ्या मान्सूनची वाट पाहतो; परंतु चालू वर्षी मात्र आता पुन्हा दुष्काळाचीच परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप पेरणी होणार का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे. मान्सून पावसावरच जिल्ह्याची शेतीव्यवस्था अवलंबून असल्याने याचीच प्रतीक्षा प्रत्येकजण करीत आहे. पावसासाठी अनेक पुरातन उपाय करण्याचेही प्रकार केले जात आहेत. देऊर गावात सध्या धोंडी काढून पाऊस मागण्याचे काम गावातील युवक करीत आहेत. धोंडी होणारा युवक हा शक्यतो अविवाहित निवडला जातो, याला सायंकाळच्या वेळी विवस्त्र करून त्याच्या कमरेखालील बाजूस संपूर्ण लिंबाच्या डहाळ्या बांधल्या जातात. त्याच्या डोक्यावर पाठ देऊन त्यावर महादेवाची पिंड ठेवली जाते व सवाद्य मिरवणूक काढून ‘धोंडी-धोंडी पाऊस दे... धोंडी गेला शिववर, पाऊस आला गावावर’ अशा आरोळ्या ही मुलं यावेळी घराघरांतील अंगणात देतात, यामध्ये धोंडी झालेल्या मुलाचं नाव व चेहरा कुठेही दिसून येत नाही.
धोंडी-धोंडी पाऊस दे..
By admin | Updated: June 30, 2014 00:30 IST