फलटण तालुक्याचा दुष्काळी भागात कापशी येथे निंबाळकर वस्ती येथील शेतकरी वर्गांनी एकत्र काळी आईची सेवा करायची, हे उद्दिष्ट उराशी बाळगून शेतीला जोडधंदा म्हणून शंभर संकरित गाई पाळून दिवसाकाठी ४०० लिटर दूध विक्री करून पाच तरुण उच्च शिक्षण घेऊनही शेतीला पर्याय नसल्याचे दाखवून दिले आहे.भारत या कृषिप्रधान देशात तरुण वर्ग शेती विकून व्यवसाय करतोय किंवा नोकरीच्या मागे लागतोय; परंतु कृष्णराव जयवंतराव निंबाळकर यांचे मूळगाव कुरवली खुर्द, ता. फलटण होते. दोन भावांचे वाटप होऊन कापशी येथील जमीन कृष्णराव निंबाळकर यांचे वाटपाला आले. नंतर त्यांनी आपल्या पाच मुले व मुली घेऊन छोटीसी झोपडी घातली व शेती हा मुख्य व्यवसाय निवडला. त्यानंतर मुले सुरेश, रमेश, मोहन, विलास, बाळासो यांनी शिक्षणाबरोबर शेतीची आवड निर्माण झाल्याने फलटण येथे दूध संघाची निर्मिती झाल्यानंतर जोडधंदा म्हणून संकरित गाई खरेदी केल्या. शेतीबरोबर दूध व्यवसायात लक्ष घातले आणि नोकरीच्या मागे न धावता आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. परंतु नोकरीपेक्षा शेती फायदेशीर ठरते हे पटवून दिले. नारायण, गणेश, सचिन, सतीश, उत्तम, सुहास, सुहाग यांनी वडिलोपार्जित शेती व्यवसायात आमूलाग्र बदल करीत उस, डाळिंब, ज्वारी, बाजरी बरोबर संकरित गाईचा चाराप्रश्न सोडवण्यासाठी मका, कडवळ, मेथी घास, गवत आदींसाठी राखीव क्षेत्र ठेवले व संकरित गाईची संख्या शंभरच्या वर नेऊन ठेवली. त्यामुळे जवळच असणारी संतकृपा दूध डेअरीवर स्वत:चा चारचाकी, दुचाकीवर दूध नेऊन ४०० लिटरची दररोज विक्री केली जाते. निंबाळकर वस्तीवर एकटे कृष्णराव आले. आता पन्नास ते साठ लोकसंख्या तर त्यांच्या दुप्पट जनावरांची आहे. दहा तरुणापैकी पाच तरुण उच्चशिक्षित आहे. परंतु कोणीही नोकरी करीत नाही. निंबाळकर वस्ती येथे कारखान्याच्या भोंग्यासारखे सर्व वेळेत काम केले जाते. सकाळी गोट्यातील शेण, सात वाजता धारा काढणे, नऊ वाजता दूध घालणे, साडेदहा वाजता जनावरांना चारा आणणे, घालणे, त्यानंतर जेवण, दुपारी शेतीची कामे परत सायंकाळी गोटा स्वच्छता, दूध काढणे, घालणे असे दैनंदिन काम कायम सुरू असते. निंबाळकर वस्ती (कापशी, ता. फलटण) हे दुष्काळी भागातील गाव आहे. परंतु पाच भाऊ त्यांची आठ मुले सर्वांची शेती एकत्र तरीसुद्धा भांडण, तंटा होत नाही. दररोज चर्चा होते. शेती व दूध व्यवसायावर होते.पाच तरुण उच्च शिक्षण घेतले. परंतु दूध व शेती व्यवसाय यात प्रगती केली. बैलजोडीबरोबर ट्रॅक्टर-ट्रॉली, शेतीला रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने शेती फायदेशीर ठरत आहे. दूध डेअरीवर नेऊन घातल्याने लिटर, डिग्री, फॅट व दर डोळ्यांसमोरच समजत असल्याने चारा पाणी यांचे नियोजन करता येते. - बाळासो निंबाळकर, (कापशी)
पदवीधर शेतकऱ्यांची दुग्ध व्यवसायात गरूडभरारी
By admin | Updated: August 10, 2015 21:18 IST