सातारा : एकीकडे महागाईने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असतानाच दुसरीकडे मात्र, घरोघरी सिलिंडर पोहोचविणाऱ्यांकडून अक्षरश: लूट केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेषत: हे प्रकार ग्रामीण भागामध्ये घडत आहेत. घरगुती सिलिंडरची किंमत ८९० असताना नागरिकांकडून तब्बल ९२५ रुपये उकळले जात आहेत. हा आर्थिक गफला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता होऊ लागलीय.
कोरोनाच्या महामारीमध्ये अगोदरच जनता हैराण झाली आहे. अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती आणखीनच खालावलीय. असे असताना ग्रामीण भागामध्ये सध्या घरोघरी सिलिंडर पोहोचविणाऱ्यांकडून लूट केली जात असल्याचे समोर येतेय. ग्रामीण भागामध्ये एक तर वाहनांची सोय नसल्यामुळे सिलिंडरची गाडी येइपर्यंत महिलांना वाट पाहावी लागते. याचाच गैरफायदा घेऊन सिलिंडर पोहोचविणारे मनमानी दर आकारत आहेत. हे सर्रास प्रकार पाटण तालुक्यातील तारळे, कोंजवडे, काटेवाडी, कडवे बुद्रुक, जगदाळवाडी, कडेव खुर्द या गावांमध्ये घडत आहेत. नागरिकांना सिलिंडरचे दर किती वाढलेत, हेही माहिती नाही. एखाद्याने एवढे पैसे कसे, असे विचारल्यास आमच्या ऑफिसला विचारा, अशी उत्तरे सिलिंडर पोहोचविणाऱ्यांकडून दिली जात आहेत. पुन्हा गॅस येणार नाही, आपली स्वयंपाकाची पंचायत होईल, असे समजून महिला नाइलाजाने ९२५ रुपये देऊन सिलिंडर घेत आहेत. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांकडून कसलीही पावती दिली जात नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची लूट केली जात असताना याकडे सेल्स ऑफिसरसह पुरवठा शाखेचेही दुर्लक्ष कारणीभूत आहे. प्रत्येक व्यक्तीकडून एका सिलिंडरच्या मागे ३५ रुपये जादा उकळले जात आहेत. हे मनमानीपणे उकळलेले पैसे नेमके कोणाच्या खिशात जात आहेत, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय.
चाैकट : म्हणे, स्वखुशीनं दहा रुपये घ्या ना...
डोक्यावर सिलिंडर घेऊन वीस पंचवीस पायऱ्या चढून घरात आल्यानंतर अनेक जण सिलिंडर पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याला स्वखुशीनं दहा रुपये देतात. अशी शहरातील परिस्थिती असताना ग्रामीण भागामध्ये मात्र, ना पायऱ्या ना इमारत. फक्त गाडीतून सिलिंडर खाली ठेवण्यासाठी प्रत्येकाकडून जर ३५ रुपये उकळत असतील तर यासारखी लुटालूट कुठेच पाहायला मिळणार नाही. यावर अंकुश लावण्यासाठी आता ग्रामीण भागातील जनता एकवटली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना यापुढे चांगलाच धडा शिकविला जाईल, असे काही युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चाैकट : वयस्कर लोकांचा विचार तरी करा
ग्रामीण भागामध्ये सध्या वयस्कर लोकच जास्त राहत आहेत. त्यांची मुले पुणे, मुंबईला कामासाठी गेलेली आहेत. असे असताना सिलिंडर पोहोचविणारे कर्मचारी गावात गाडी न नेता काहीही कारण सांगून गाडी गावच्या बाहेर उभी करताहेत. ७० वर्षांच्या आजीबाईंना १४ किलोचा सिलिंडर उचलेल का, याचाही विचार हे कर्मचारी करत नाहीत. इतकी मनमानी या कर्मचाऱ्यांची सुरू आहे.