दरम्यान, पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांचे प्रस्ताव सादर होणे गरजेचे आहे. मात्र, जलजीवन मिशन अंतर्गत असे प्रस्ताव गावातून येतच नसतील तर संबंधित गावांचे ग्रामसेवक काय करतायत? असा प्रश्न उपस्थित करून ग्रामसेवकांच्या कारभारावर उपसभापती रमेश देशमुख यांनी ताशेरे ओढले.
येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्यासह सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीला पाणी पुरवठा विभागाकडून आढावा देण्यात आला. आकाईचीवाडी, भुरभुशी, वानरवाडी, जिंती, ओंड, वहागाव, खुबी, हेळगाव, वाघेश्वर, कांबीरवाडी, चिखली, खराडे, नवीन कवठे, बानुगडेवाडी, गोटे, वनवासमाची-खोडशी, धोंडेवाडी, वनवासमाची-सदाशिवगड, धोंडेवाडी-डिचोली पुनर्वसन, नांदलापूर, कालेटेक, सुर्ली, कामथी, संजयनगर, तासवडे, बामणवाडी, पवारवाडी-नांदगाव, गोसावेवाडी, खोडजाईवाडी, घोलपवाडी, गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, अंतवडी, कालेटेक, किवळ, वडोली भिकेश्वर, रिसवड, कोरीवळे व डफळवाडी या गावांमध्ये भविष्यात पाणी टंचाई भासू शकते. त्याचा आराखडा जिल्हा परिषदेला सादर करण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
उपसभापती रमेश देशमुख यांनी गावातून जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्तावच येत नसतील तर ग्रामसेवक काय करताहेत? अशी विचारणा केली. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी पाणी पुरवठा विभागाने ग्रामसेवकांना माहिती देऊन प्रस्ताव तयार करुन घेतले पाहिजेत, अशा सूचना केल्या.
पंचायत समिती संदर्भातील अनेक बैठकांना आणि पंचायत समितीच्या विविध विभागांच्या कार्यक्रमांना सदस्यांना बोलवलेच जात नाही, असा आरोप सभापती प्रणव ताटे, सदस्या फरिदा इनामदार, अर्चना गायकवाड, सदस्य रमेश चव्हाण, अॅड. शरद पोळ यांनी उपस्थित केला. सभापती ताटे यांनी संबंधित बैठकांना सदस्यांना का सांगितले जात नाही अशी विचारणा करुन त्या बैठकांना किती ग्रामसेवक उपस्थित असतात? ग्रामसेवकच नसतील तर कसे आराखडे करणार असे सुनावले. सदस्या फकीर यांनीही बैठकांना, कार्यक्रमांना बोलवले जात नाही हे तीन वर्षे आम्ही सांगत आहोत, तरीही सुधारणा होत नाही, मग त्याचा उपयोग काय ? असे उद्विग्नपणे सांगितले. सदस्य चव्हाण यांनीही सुधारणा होणार नसेल तर तसे सांगा असे म्हणाले. त्यावर सभापती ताटे यांनी माफी मागून उपयोग नाही, यापुढे सुधारणा दिसली पाहिजे, असे खडसावले.
- चौकट
कऱ्हाड, मलकापुरात भरणार शेतकरी बाजार
तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांनी कृषी विभागाच्या नवीन योजनांची माहिती देऊन संत सावता माळी शेतकरी बाजार कऱ्हाड शहर आणि मलकापूरमध्ये भरवण्यात येणार असल्याचे सांगितले. सभेत बांधकाम, शिक्षण, लघू पाटबंधारे, ग्रामपंचायतसह अन्य विभागांचा आढावा झाला. उपसभापती देशमुख यांनी आभार मानले.
- चौकट
शेतकऱ्यांचे १३२ कोटी वीज बिल थकीत
वीज कंपनीच्या आढाव्यावेळी ३५६ शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची वीज थकबाकी १३२ कोटी आहे. त्यांना वीज बिल भरण्यामध्ये सूट देण्यात आली. त्यासाठी गावोगावी बैठका घेण्यात येत असल्याचेही सांगितले. स्ट्रीट लाईटसाठी जिल्हा नियोजनमधून पैसे मिळावे, अशी मागणी सदस्य देवराज पाटील यांनी केली.