लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना संकटामुळे व्यापारी, विक्रेत्यांची आर्थिक घडी विस्कटली. अनेक उद्योग, व्यवसाय डबघाईला आले. अशा संकटकाळात विघ्नहर्त्याचे आगमन झाले अन् व्यापारी, विक्रेत्यांचं विघ्न दूर झालं. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तब्बल दीड वर्षानंतर जिल्ह्याची बाजारपेठ गजबजून गेली. अगदी सुईपासून सोन्यापर्यंत झालेल्या खरेदी-विक्रीतून जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल झाली.
सध्या कोरोना संक्रमणाचा काळ सुरू आहे. या कोरोनाचा सर्वाधिक फटका उद्योग, व्यवसाय, व्यापारी व हातावर पोट असलेल्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना बसला. सततच्या संचारबंदीमुुळे अनेक व्यवसाय डबघाईला आले. अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला. मात्र, गणरायाचे आगमन झाल्यापासून बाजारपेठेत पूर्वीसारखेच चैतन्य आले आहे. गणपती व गौराईसाठी लागणाऱ्या वस्तूंनी जिल्ह्याची बाजारपेठ गजबजून गेली. या वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून अनेक छोट्या-मोठ्या व्यापारी व विक्रेत्यांना दिलासा मिळाला. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. संकटकाळात विघ्नहर्त्याने विघ्न दूर केल्याने व्यापारी, विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
(चौकट : फोटो १६ जावेद ०१)
मोदक, पेढ्यांचा वाढला गोडवा
उत्सवकाळात कंदी पेढे व मोदकांची जवळपास वीस टन विक्री झाली. इतर फराळाचे साहित्यही यंदा महागले होते. तरीही नागरिकांनी पेठे, मिठाई व तयार फराळाची भरभरून खरेदी केली. मिठाईने विक्रेत्यांमध्ये गोडवा आणण्याचे काम केले.
(चौकट : फोटो : १६ जावेद ०२)
भाजीपाल्याने अनेकांना तारले
गणेशोत्सव सुरू झाल्यापासून सर्वच पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, पालेभाज्यांची मागणी काही कमी झाली नाही. प्रदीर्घ कालावधीनंतर भाजीविक्रेत्यांचे चेहरे आनंदाने फुलले. अजूनही पालेभाज्यांना मागणी सुरूच आहे.
(चौकट : फोटो : १६ फोटो ०३)
पूजेचे साहित्य, हारांना मागणी
अगरबत्ती, धूप, कापूर, लोबाण, फुले, हार यांसह इतर पूजेच्या साहित्याची जिल्ह्यात मोठी आवक झाली होती. बाजारपेठ खुली झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या व्यतिरिक्त सजावटीो साहित्यही यंदा अधिक विकले गेले.
(चौकट : फोटो १६ जावेद ०४)
फळांनाही आली लाली...
गणेशोत्सव सुरू झाल्यापासून केली, सफरचंद, संत्री, मोसंबी, डाळिंबी अशा फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. सर्वच फळांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. असे असले तरी गेल्या आठ दिवसांत फळांच्या खरेदी-विक्रीतून लाखोंची उलाढाल झाली आहे.
(चौकट : फोटो १६ जावेद ०५)
सुवर्णपेढीला झळाळी
सराफा व्यावसायिकांना देखील लॉकडाऊनचा प्रचंड मोठा फटका बसला. दागिन्यांचे दरही सातत्याने वाढत होते. त्यामुळे सराफा बाजारात मंदीचे सावट पसरले होते. गणेशोत्सवात ही मंदी काही प्रमाणात दूर झाली अन् भाविकांनी गणपती व गौराईसाठी दागिन्यांची खरेदी केली.