लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी विद्यमान संचालक आमदार जयकुमार गोरे आणि भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांना अपात्र ठरविण्यात आले, कोत्या बुद्धितूनच अपात्रतेचा निर्णय झाल्याची टीका आ. गोरे यांनी केली असून त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहेे.
जिल्हा बँकेने प्रसिद्ध केलेल्या १९६३ जणांच्या कच्च्या मतदार यादीवर ४६ आक्षेप दाखल झाले असून या हरकतींवर विभागीय सहनिबंधक कार्यालय कोल्हापूर येथे सुनावणी सुरू आहे. गृहनिर्माण संस्थेतून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी केलेले ठराव ते दोघे संस्था सभासद नसल्याचे कारण देत सातारा जिल्हा बँकेने रद्द केले होते.
जिल्हा बँकेने सभासद नसल्याचे कारण देत दोघांचेही ठराव रद्द केले आहेत. या संदर्भात कोल्हापूर येथे विभागीय सहनिबंधकांसमोर बुधवारी दीड तास सुनावणी झाली. भाजपच्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी विभागीय सहनिबंधकांकडे दाखल केलेल्या आक्षेपावर दीड तास सुनावणी झाली. यावेळी वकिलांच्या माध्यमातून युक्तिवाद करण्यात आला. पुढील आठवड्यात या सुनावणीवर निर्णय होणार असल्याचे विभागीय सहनिबंधकांनी सांगितले.
दरम्यान, बँक म्हणजे निवडणूक आयोग नाही. निवडणूक प्राधिकरणाने पाहणीसाठी मतदार यादी बँकेला दिली होती. बँकेने राजकारण करुन यादीतील नावे अपात्र केली आहेत. बँकेने अधिकार नसताना घेतलेला हा निर्णय बेकायदेशीर आहे. मी सोसायटी सभासद आहे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार बँकेला कोणी दिला. सहनिबंधकांकडे सुनावणीवेळी म्हणणे सादर केले आहे. २२ सप्टेंबर रोजी निकाल दिला जाईल. तसेच २७ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर न्यायालयात जाण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.
लढण्याआधी भीती कशासाठी...!
निवडणुकीत पराभूत करता येत नसल्याने अधिकार नसताना बेकायदेशीररित्या बँकेने आम्हाला अपात्र ठरवले आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदार संख्या वाढण्याऐवजी कमीच होताना दिसते. जे मतदान करत नाहीत किंवा विरोधात उभे राहतात, त्यांना बाजूला करण्याचे काहींचे धोरण आहे. लढण्याआधीच त्यांना माझी भीती वाटते. मी हार मानणार नाही. वेळप्रसंगी न्यायालयात जाऊन न्याय मिळविला जाईल, अशी माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली आहे.
(खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे आयकार्ड फोटो वापरावेत)