सातारा : कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू असल्याने संचारबंदी आहे. अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ‘महावितरण’ला मीटर रिडिंग घेणे शक्य न झाल्यास वीज ग्राहकांना मीटर रिडिंग पाठविण्याची सोय ‘महावितरण’ने केली आहे. मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे ग्राहकांनी स्वत:हून मीटर रिडिंग पाठवावे, असे आवाहन ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी केले आहे.
‘महावितरण’कडून केंद्रीकृत वीज बिल प्रणाली सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीज ग्राहकांच्या मीटरचे फोटो रिडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रिडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीज बिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकदेखील नमूद आहे. रिडिंगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसआधी ‘महावितरण’कडून सर्व ग्राहकांना स्वत:हून रिडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वत:हून मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठविता येईल.
असं पाठवा रिडिंग!
महावितरण मोबाईल अॅपमध्ये ह्या ‘सबमीट मीटर रिडिंग’वर क्लिक करून मीटर क्रमांक नमूद करावा. मीटर रिडिंग घेताना वीज मीटरच्या स्क्रीनवर तारीख व वेळेनंतर रिडींगची संख्या व केडब्लूएच असे दिसल्यानंतरच फोटो काढावा. त्यानंतर फोटो काढलेले रिडिंग अॅपमध्ये अंकात नमूद करावे व सबमीट करावे. मोबाईल अॅपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रिडिंग थेट सबमिट करता येईल. मात्र, गेस्ट म्हणून मीटर रिडिंग सबमिट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागतो.
स्वत:हून मीटर रिडिंग घेण्याचे फायदे
प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी हे रिडिंग पाठविण्यासाठी लागतो. मात्र, यामुळे स्वत:च्या मीटरकडे व रिडिंगकडे नियमित लक्ष देता येते. वीज वापरावरदेखील नियंत्रण राहील. रिडिंगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरूस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रिडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल.
कोट :
महावितरणच्या हरएक घटकाने कोविड आणि लॉकडाऊन काळातील जगणं सुसह्य केले. गेल्या सव्वा वर्षांत वीज पुरवठा खंडित न होण्याचं श्रेय या राबणाऱ्या हातांना जातं. दुसऱ्या लाटेत कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ‘महावितरण’ने सुरू केलेल्या उपक्रमाला ग्राहकांनी पाठबळ देऊन सहकार्य करावे.
- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता
---------------------