परळी : माण-खटावसाठी वरदायी ठरलेल्या उरमोडी धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या धरणावर ‘आओ जाओ घर तुम्हारा’ स्थिती पाहावयास मिळत असून, सुरक्षारक्षकच गायब आहे. रेकॉर्ड रूमची दुरवस्था, विद्युत दिवे गायब अशा असंख्य समस्यांनी उरमोडी धरणाला ग्रासले आहे.५२ टीएमसी पाणीसाठा करण्याच्या राज्यपालांच्या कार्यक्रमांतर्गत सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात उरमोडी नदीवर ९.९६ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेले धरण १४१७ कोटी रुपये खर्चून २०१० मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. ५०.१० मीटर उंच व १८६० मीटर लांबीच्या या धरणातील पाणीसाठ्यामुळे सातारा तालुक्यातील ८३०० हेक्टर तर दुष्काळी माण-खटाव तालुक्यांतील प्रत्येकी ९७२५ हेक्टर असे एकूण २७७५० हेक्टर क्षेत्र उलिताखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले होते आणि ते पूर्णही झाले आहे. परंतु अशा या उरमोडी धरणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच असून, सुरक्षेचाच मुख्य प्रश्न ऐरणीवर आला आहे.सध्या उरमोडी धरण क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने धरण सुमारे ९५ टक्के भरले असून, त्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सर्व परिसर हिरवाईने बहरला असून, या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. परंतु सुमारे १४१७ कोटी रुपये खर्चून केलेला प्रकल्प सुरक्षेविना धोक्याचा ठरू लागला आहे. २०१० साली उरमोडी जलाशयावर दोन्ही बाजूंना गेट उभारून त्या ठिकाणी सुरक्षारक्षक बसविण्यासाठी त्यांना खोल्या बनविल्या होत्या. परंतु त्या खोल्या नसून कचऱ्याचे डबे बनले आहेत. त्या सर्व खोल्यांच्या काचा फोडल्या आहेत. लोखंड गायब केले आहे. फिरायला येणारे पर्यटक त्या खोल्यांमध्ये कचरा टाकत आहेत. येथील रेकॉर्ड रूममध्ये २४ तास व्यक्ती असावी लागते. परंतु आजपर्यंत ही रेकॉर्ड रूम उघडलीही नाही. या खोलीला गेल्या दोन वर्षांपासून टाळे लावले आहे. रेकॉर्डऐवजी या खोलीत फक्त उंदराने कुरतडलेल्या वायर दिसत आहेत. नियंत्रण कक्षालाही टाळे लावले आहे. उरमोडीच्या दोन्ही बाजूंच्या कमानीवर ‘येथे फोटो काढण्यास मनाई आहे,’ असे फलक लिहिले आहेत. परंतु बहुतेक सर्वच पर्यटक केवळ धरणाचेच नव्हे, तर पाण्यात उतरून ‘फोटोसेशन’ करीत आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने धरणावर कोणीही, कधीही येऊ शकते. गेट सदैव खुलेच असते. स्थानिक ग्रामस्थही सायंकाळी फिरायला धरणाच्या भिंतीवर येतात. सुरक्षारक्षक नसल्याने धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न रामभरोसे आहे. (वार्ताहर)लाखो रुपये पाण्यातउरमोडी धरणासाठी परिसरातील सुमारे साठ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. उरमोडी धरणात २०१० पासून पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली. याच वेळी लाखो रुपये खर्च करून उरमोडी धरण विभागामार्फत उरमोडीच्या संपूर्ण भिंतीवर विजेचे दिवे लावण्यात आले. गॅलरीमध्येही दिवे लावण्यात आले. सुमारे शंभर दिवे यावेळी बसविण्यात आले. परंतु ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे हे दिवे काही दिवसच चालू राहिले. येणाऱ्या पर्यटकांनी सुमारे ८० दिवे फोडून टाकले, तर अनेक दिव्यांच्या वायर गायब केल्या आहेत. ओल्या पार्ट्या रंगल्याउरमोडी धरणावर सुरक्षा रक्षकांसाठी खोल्या केल्या आहेत. त्या ठिकाणची अवस्था दयनीय झाली असून, त्या ठिकाणी स्थानिक युवक आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या ओल्या पार्ट्या रंगत आहेत. सायंकाळच्या वेळी प्रेमी युगुले आक्षेपार्ह वर्तनासाठी या खोल्यांचा बिनदिक्कत वापर करीत आहेत.
‘उरमोडी’वर आओ-जाओ घर तुम्हारा!
By admin | Updated: August 7, 2014 00:14 IST