कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लोकांनी सामाजिक पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोरोनाची लक्षणे दिसत असताना चाचणीसाठी उशीर केलात, तर मात्र पुढे अडचणी वाढू शकतात. यामुळे तुम्ही तुमचे कुटुंब आणि समाजालाही अडचणीत टाकत आहात. ताप किंवा थंडी वाजणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला किंवा घसा खवखवणे, चव न कळणे किंवा वास न येणे, थकवा येणे अशी कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास चाचणी करून घेणे नक्कीच फायदेशीर ठरते. वेळीच निदान झाल्यास उपचार करणे आणि बरे होण्याचा वेग नक्कीच वाढतो.
कोरोना झाल्यानंतर औषधोपचार घेऊन आणि १४ दिवस आयसोलेशनमध्ये राहिले की कोरोनामुक्ती झाली असे नसते. पुन्हा आपण पूर्णपणे फिट झालो असा अनेक रुग्णांचा समज असतो. मात्र, रुग्ण पूर्णपणे बरा होण्यासाठी काही अधिकचा अवधी लागतो. कोविड मुक्त झाल्यानंतरही समूहात जाणे टाळणे आणि श्वसनाचे व्यायाम या दिवसांत करणे उपयुक्त ठरते.
कोरोनाची लस घेतल्यानंतरही लगेचच पूर्णपणे प्रतिकारशक्ती तयार होत नाही. म्हणून आपल्याला लस घेतल्यानंतरही कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. मास्कचा वापर करणे, हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रींमुळे कोरोना संसर्गापासून बचाव करता येणे शक्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. बऱ्याच रुग्णांना कोविड १९ ची सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टर होम आयसोलेशनचा सल्ला देतात. पण रुग्णांनी घराबाहेर न जाता व तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या संपर्कात न येता आयसीएमआरच्या नियमानुसार होम आयसोलेशनचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने वेळोवेळी कोविड चाचणी करणे आवश्यक आहे.
कोविड १९ हा बरा होणारा आजार आहे. महामारीच्या काळात संसर्गाला घाबरून न जाता प्रत्येक व्यक्तीने त्यावर मात करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार ८० टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येतात तर १० ते १५ टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासते. यापूर्वी देखील देशात अनेक महामारीसारखी संकटे आली होती आणि त्यावर आपण यशस्वीरित्या मात केली असून या कोरोना महामारीवरदेखील आपण नक्कीच मात करू शकतो.
- डॉ. प्रवीणकुमार जरग
जनरल फिजिशियन, सातारा