आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरलेला धोम-बलकवडी कालवा आदर्कीच्या ओढ्याखालून गेल्याने नैर्सगिक पाण्याचे स्रोत तुटल्याने ओढा कोरडा पडला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आल्याने कालवा उशाला अन् कोरड घशाला, अशी अवस्था आदर्कीतील शेतकऱ्यांची झाली आहे.
फलटण तालुक्यातील ८४ गावे दुष्काळाने होरपळत होती. दुष्काळात गावेच्या गावे स्थलांतरित होत होती, म्हणून कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाला मिळावे म्हणून धोम धरणातून सांगली जिल्ह्याला गेलेल्या धोम कालव्याला शिवथर खिंडीतून समांतर कालवा काढून अंबवडे, देऊर, वाठार गाव, महाकाली दरी, आदर्की असा सर्व्हे झाला होता; पण राजकीय इच्छाशक्तीमुळे मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर १९९६ मध्ये युती शासनाच्या काळात बलकवडी धरणास मंजुरी मिळाली. धरणाचे काम सुरू असताना कालव्याचे सर्वेक्षण सुरू झाले. त्यावेळी आदर्की खुर्द येथे खंडोबा मंदिर, बिचकुले वस्ती, काळवट, सापमारी तलावाच्या वरच्या बाजूने सर्व्हे झाला. त्यानंतर पाच वर्षांनी सर्व्हे बदलून गावाजवळून सर्व्हे झाला. त्यामुळे कालवा तीस फूट खोल झाला, तर पाझर तलावाच्या खालच्या बाजूने बोगदा पाडून कालवा खुदाई झाली. आदर्की खुर्द मुख्य ओढा व छोटे दोन ओढ्यांच्या खालून कालवा गेल्याने नैसर्गिक पाण्याचे त तुटल्याने कालवा वाहत असला तरी ओढा कोरडाच असतो. त्यामुळे प्रत्येकवर्षी दुष्काळ पडत होता म्हणून लोकवर्गणीतून चारशे फूट चारी खोदून सिमेंट पाईप टाकून ओढ्याला कालव्यातून पाणी सोडण्याची व्यवस्था केली; पण कालव्यातील पाईप बसवताना कालव्याच्या तळाला बसवली नाही, त्यामुळे ओढ्यातील पाणी पाईपमधून येत नाही, त्यामुळे ओढा कोरडा पडतो. सहा बंधारे व अनेक विहिरींची पाणी पातळी खालावल्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.
(चौकट)
सिमेंट बंधाऱ्यातील पाणी कालव्यात...
आदर्की-हिंगणगाव ओढा नैसर्गिक पाण्याने नऊ महिने वाहत असे. धोम-बलकवडी कालवा झाल्यापासून दोन-तीन महिनेच वाहतो. नैसर्गिक पाण्याचे स्रोत तुटले आहेत, तर कृषी खात्याने कालव्याच्या शंभर फूट वरच्या बाजूला सिमेंट बंधारा बांधल्याने बंधाऱ्यातील पाणी कालव्यात येते. दुसरा सिमेंट बंधारा कालव्याच्या दोनशे फुटांवर खालच्या बाजूला बांधल्याने पुराच्या पाण्याने बंधरा भरला की कालव्यात पाणी उतरते.
(कोट..)
धोम-बलकवडी उजव्या कालव्यामुळे जिरायती क्षेत्र बागायती झाले; पण आदर्की खुर्द-हिंगणगाव ओढा कोरडा पडत असल्याने रब्बी व उन्हाळी हंगाम धोक्यात येतो. पाणी ओढ्यात येण्यासाठी पाईप बसवल्या आहेत. पण ओढ्याचे पाणी पाईपमधून येत नाही. त्याची पाहणी करून ओढ्याचे नैसर्गिक पाणी ओढ्याला सोडून ओढा प्रवाहित करावा.
- विश्वासराव निंबाळकर, ज्येष्ठ नागरिक, आदर्की खुर्द
०१आदर्की ओढा
फोटो -
धोम-बलकवडी कालवा आदर्कीच्या ओढ्याखालून गेल्याने नैसर्गिक पाण्याचे स्रोत तुटल्याने आदर्की-हिंगणगाव ओढा कोरडा पडला आहे.