सचिन काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आगऱ्याचा पेढा, नाशिकची द्राक्षे अन् नागपूरच्या संत्र्याप्रमाणे सातारी कंदी पेढ्यानेही जगाच्या पटलावर आपले नाव कोरले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा पेढा भारतातच नव्हे, तर लंडन, अमेरिकेतही पोहोचला आहे. बाजारपेठेतील मागणी पाहता उत्सवकाळात पेढे अन् कंदी मोदकांची ३० टन विक्री होईल, अशी आशा व्यावसायिकांना आहे.
सातारा म्हटले की, आपल्या जिभेवर रेंगाळू लागतो तो कंदी पेढ्याचा गोडवा. गेल्या अनेक वर्षांपासून या पेढ्याने जगभरातील खवय्यांच्या घरात मानाो स्थान पटकावो आहे. सातासमुद्रापार गेलेल्या या पेढ्याला गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या काळात प्रचंड मागणी असते; परंतु कोरोनामुळे दोन वर्षांपासून पेढ्यांची मागणी काही प्रमाणात घटली आहे. पूर्वी गणेशोत्सवात ४० ते ४५ टन पेढ्यांची विक्री होत असे. मात्र, गेल्या वर्षी ही विक्री २० टनांवर आली, तर यंदा बाजारपेठेतील मागणी पाहता ३० टन पेढे व मोदकांची विक्री होईल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
विदेशात राहणारे भारतीयदेखील दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात. येथील गणेशभक्तांकडून बाप्पांना कंदी पेढ्यांचा नैवेद्य दाखविला जातो. यंदाही मागणीप्रमाणे सातारी कंदी पेढा लंडन व अमेरिकेतील बाप्पांसाठी रवाना झाला आहे. निर्बंधांमुळे विदेशातून मागणी कमी झाली आहे, तरीही यावेळी १०० किलो पेढे विदेशात रवाना करण्यात आले आहेत. कोरोनापूर्वी ६०० ते ७०० किलो पेढ्यांची निर्यात केली जायची.
(चौकट)
या ठिकाणी मागणी अधिक
कोरोनामुळे कंदी पेढे व कंदी मोदकांची मागणी काही प्रमाणात कमी झाली आहे. तरीदेखील महाराष्ट्रासह हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, पंजाब, हरियाणा या ठिकाणाहून कंदी पेढ्यांना सर्वाधिक मागणी आहे.
(चौकट)
यंदा चक्क ‘शुगर लेस’ मोदक
पेढा असो की मोदक त्याचा गोडवा हा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. मात्र, मधुमेह असलेल्या रुग्णांना इच्छा असूनही हे पदार्थ खाता येत नाहीत. अशा व्यक्तींसाठी साताऱ्यातील बाजारपेठेत यंदा चक्क ‘शुगरलेस’ मोदक विक्रीसाठी दाखल झाले आहेत. कोणत्याही कृत्रिम रंगांचा वापर न करता केवळ खवा, दूध, केसरचा वापर करून हे मोदक तयार केले जातात. ८८० रुपये प्रति किलो या दराने शुगरलेस मोदकांची विक्री केली जात आहे.
(चौकट)
मोदकाचे प्रकार आणि दर
ड्रायफ्रूट १८००
रातराणी ९२०
वेलची ७२०
गुलकंद ७२०
लोटस ७२०
केशरयुक्त ७२०
चॉकलेट ७२०
शुगरलेस ८८०
(चौकट)
मोदकाचे वजन १२ ग्रॅम ते ५ किलो
(कोट)
उत्सवकाळात बाजारपेठ खुली झाल्याने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा बाजारात कंदी पेढ्यांबरोबरच १० ते १८ प्रकारचे मोदक विक्रीस उपलब्ध आहेत. सध्या ड्रायफ्रूट, रातराणी, केशरयुक्त व शुगरलेस पेढ्यांना अधिक मागणी आहे. यंदा २५ ते ३० टन कंदी पेढे व मोदकांची विक्री होईल, असे चित्र आहे.
- प्रशांत मोदी, व्यावसायिक