परळी : ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरींचं’ म्हणत लग्न किंवा इतर समारंभात पळसांच्या पानांच्या पत्रावळीवर उठणाऱ्या पंक्ती आता कमी होऊ लागल्या आहेत. साहजिकच या पत्रावळींची जागा प्लास्टिक, थर्माकोलच्या पत्रावळींनी घेतल्याने पानांपासून पत्रावळी बनवणाऱ्या पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला आहे.पूर्वी परळी खोऱ्यासह खेडोपाड्यात शहरात सर्वत्र विवाह, सप्ताह व इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात पळसांच्या पानापासून बनविलेल्या पत्रावळ्या वापरल्या जायच्या. मात्र, सध्याच्या युगात या पत्रावळी कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाहीत. या पत्रावळींची जागा प्लास्टिक, थर्माकोलच्या पत्रावळींनी घेतली आहे. पूर्वी परिसरातील डोंगरामध्ये, गावांमध्ये पळसांची पाने विपूल प्रमाणात आढळून येत असत. या व्यवसायात जास्त प्रमाणात महिलांचाच सहभाग असून, यातील काही महिला व व्यवसायावरच कुटुंबाचे उदरनिर्वाह सांभाळत आहेत.ग्रामीण भागातील यात्रांचा हंगाम, सुटीत आलेल्या पाहुण्यांना ताटात जेवण न देता पत्रावळीत आवडीने वाढले जायचे; मात्र अलीकडच्या काळात पत्रावळींचे महत्त्व कमी झाले असून, प्लास्टिक व थर्माकोलला महत्त्व आलेले दिसत आहे. (वार्ताहर)पळसांच्या पानाची पत्रावळी बनविण्यास खूप वेळ लागतो; परंतु प्लॅस्टिकच्या, थर्माकोलची पत्रावळी बनविण्यास वेळ लागत नसून चक्क एका तासात एक हजार पत्रावळ्या तयार होतात; परंतु सध्याच्या पत्रावळ्या स्वस्त असल्याने प्लास्टिक, थर्माकोलच्या पत्रावळ्यांची मागणी वाढली असून चुकून कुठे तरी पळसांच्या पानाची पत्रावळी पाहावयास मिळत आहे.-संपत पवार, व्यावसायिक, वाघमवाडीआयुर्वेदिक पत्रावळी पंक्तीतून हद्दपारपुरातन काळापासून मंगल कार्यालयातील जेवण समारंभासाठी पळसांच्या पानापासून बनविलेल्या पत्रावळी व द्रोणांचा वापर केला जात असे. पळसांच्या पानात आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. पळसांच्या पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. शिवाय पळसांच्या पानाला कीडही लागत नाही. या पत्रावळी सहज उपलब्ध होतात. मात्र, स्वस्त आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या या पत्रावळीच पंक्तीतून हद्दपार होत असल्याचे चित्र आहे.
पळसांच्या पानाअभावी पत्रावळी पडद्याआड!
By admin | Updated: April 8, 2015 23:53 IST