सातारा : हद्दवाढीमुळे सातारा पालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा ८६ कोटींनी वाढ झाली असून, तो २१२ वरून २९६ कोटींवर पोहचला आहे. हद्दवाढीतील पायाभूत सुविधांचा या अर्थसंकल्पात अंतर्भाव केला जाणार असल्याने नागरिकांच्या पालिका प्रशासनाकडून अपेक्षा वाढू लागल्या आहे.
पालिकेने गतवर्षी करवाढ नसणारा अर्थसंकल्प सादर करून सातारकरांना थोडाफार दिलासा दिला; परंतु उत्पन्नवाढीच्या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मालमत्ता कर, मुद्रांक शुल्क, करमणूक कर, खुल्या जागेचे भाडे, इमारत भाडे, पाणी कर, विकास कर, थकीत घरपट्टीवरील विलंब आकार कर, जकात कर, रस्ते विकास या पालिकेच्या उत्पन्नाच्या प्रमुख बाबी आहेत. मात्र, पालिकेकडून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले जात नाही. उलट आस्थापना व प्रशासकीय खर्च, आरोग्य, पाणीपुरवठा शिक्षण, दुरुस्ती व देखभाल तसेच इतर विकासकामांवर अवाढव्य खर्च केला जात आहे. यावर्षी कोरोना प्रतिबंधासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवरही भरमसाठ खर्च झाला. भांडवली खर्चाचा बोजा वाढल्याने पालिकेचा अर्थसंकल्प गतवर्षी २४५ वरून २१२ कोटींवर घसरला. यंदा मात्र हद्दवाढीमुळे अर्थसंकल्पात तब्बल ८६ कोटींची वाढ झाली असून, तो २९८ कोटी ६६ लाख ६६ हजार ३२५वर पोहोचला आहे.
हद्दवाढीतल्या भागातील पायाभूत सुविधांसाठी ३० कोटींची कामे प्रस्तावित केली जाणार असून, राज्य शासनाकडून येणाऱ्या पहिल्या टप्प्यातील अनुदानात रस्ते गटार व इतर पायाभूत सुविधांकरिता दहा कोटींची तरतूद असेल असा अंदाज आहे. अर्थसंकल्पीय सभा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते. या सभेत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हा अर्थसंकल्प सादर करतील. हा अर्थसंकल्प शहरवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करतो की नाही हे पाहणे औत्स्तुक्याचे ठरणार आहे.
(चौकट)
उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे
पालिकेने शहरातील व्यापारी गाळ्यांना वार्षिक भाडे अंदाज ठरवून दिलेला नाही. पालिकेच्या जागेत फलक लावणाऱ्यांनी काही जागा वर्षाच्या करारावर घेतल्या आहेत. त्यांच्याकडून फी वसूल केली जात नाही. करंजे येथील ५७ भूखंड पालिकेच्या मालकीचे आहेत. हे भूखंड पालिकेने ताब्यात घेतले नाहीत. गाळ्यांचा फेरलिलाव केला जात नाही, त्यांची नव्याने भाडेनिश्चिती होत नसल्याचे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. हा विषय पालिकेने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
लोगो : सातारा पालिकेचा फोटो