चाफळ : रस्त्यासाठी संघर्ष करीत आमच्या दोन पिढ्या संपल्या. तरीही डोळ्यावर पट्टी बांधून बसलेल्या शासनाला आजही जाग येत नाही. ‘गाव तेथे रस्ता,’ या घोषणेचा डांगोरा पिटणाऱ्या शासनाने आमच्यावरच का अन्याय केला आहे. स्वातंत्र्यानंतरही आमच्यावर पारतंत्र्याचं जिणं जगण्याची वेळ आली असून, आमच्या गावाला रस्ता मिळणार का? असा सवाल कोळेकरवाडी व वनवासवाडी ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.पाटण तालुक्याच्या दुर्गम व डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या चाफळपासून सात किलोमीटर अंतरावर उंच डोंगराच्या माथ्यावर ही गावे एकमेकापासून केवळ पाचशे मीटर अंतरावर वसली आहेत. याठिकाणी रस्ताच नसल्याने या गावांना मूलभूत सुविधा म्हणजे काय? हे आजही माहीत नाही. कोळेकरवाडी व वनवासवाडी या गावांना ये-जा करण्यासाठी ग्रामस्थांनी डोंगरातून पाऊलवाट तयार केली आहे. येथील ग्रामस्थ, महिला आजही डोंगराच्या पायवाटेने पायपीट करीत शिंगणवाडीत येतात. तेथून खासगी वाहनाने अथवा पुन्हा पायपीट करीत चाफळच्या बाजाराला जावे लागते. ही अवस्था वर्षोनुवर्षे तशीच असून, या नरक यातनेतून त्यांना आजही कोेणीही सोडवलेले नाही. डोंगर पायथ्याची गावे निर्मलगावे झाली असली तरी डोंगरावरील या छोट्याशा गावात योजना न पोहोचल्याने गावात अस्वच्छतेचे अक्षरश: साम्राज्य पसरलेले पाहावयास मिळत आहे. कोळेकरवाडी व वनवासवाडी गावांना ये-जा करण्यासाठी शिंगणवाडी-बोर्गेवाडीमार्गे रस्ता काढल्यास केवळ दोन किलोमीटर अंतरात हा रस्ता तयार होऊन चार गावे एकमेकांना जोडली जातील. मात्र, याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही, असे ग्रामस्थांचे म्हणने आहे. (वार्ताहर)नवीन रस्ता केल्यास दळणवळणाचा प्रश्न निकालीमाजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी दाढोली-पाटण, जळवखिंड फोडून मणदुरेमार्गे पाटण यासारखे अनेक महत्त्वकांक्षी रस्ते तयार केले आहेत. मात्र गेल्या २७ वर्षांपासून त्यांची पाठराखण करणाऱ्या या गावांना रस्त्यापासून वंचित का ठेवले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. डेरवण ते बहिरेवाडी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण केल्यास आणि वनवासवाडी-कोळेकरवाडी ते बहिरेवाडी नवीन रस्ता तयार केल्यास या तिन्ही गावांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.
पाऊलवाटेने सात किलोमीटर पायपीट
By admin | Updated: May 14, 2015 00:29 IST