सांगली : वसंतदादा साखर कारखान्याकडे जुलैचे साडेसहा लाखांचे वीजबील थकीत असल्याने महावितरणने काल, गुरुवारपासून कारखान्याचा संपूर्ण वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे कारखान्याचे कामकाज ठप्प झाले असून, येथील सुमारे पावणेदोनशे कुटुंबे अंधारात बुडाली. कारखाना प्रशासनाने कसाबसा सायंकाळी जनरेटरद्वारे वीजपुरवठा सुरू केला.आशिया खंडातील सर्वांत मोठा साखर कारखाना म्हणून एकेकाळी नावलौकिक मिळविलेला वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला आहे. मागील गळीत हंगामातील शेतकऱ्यांचे ४५ कोटींचे ऊसबिल थकीत आहे. उसाची बिले आणि कामगारांची चार कोटींची देणी भागविण्यासाठी कामगार आयुक्त आणि साखर आयुक्तांच्या आदेशाने मिरजेच्या तहसीलदारांनी कारखान्याला मालमत्ता जप्तीच्या दोन नोटिसा बजावल्या आहेत. साखर गोदामालाही सील ठोकण्यात आले आहे. शिवाय कारखान्यावर जिल्हा बँकेचेही ७८ कोटींचे कर्ज आहे. थकीत देणी देण्यासाठी संचालक मंडळाने कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. कारखान्याच्या उत्तर बाजूला सांगली-माधवनगर रस्त्यालगत ही जागा आहे. राज्य शासनाने जागा विक्रीस मंजुरी दिली आहे. आता कारखान्याकडे जुलै महिन्यातील साडेसहा लाखांचे वीज बिल थकीत आहे, ही थकबाकी भरण्यासाठी कारखाना प्रशासनाला महावितरणने नोटीस बजावली होती. या नोटिसीची मुदत ९ सप्टेंबरला संपली. प्रशासनाने काहीच हालचाल न केल्याने काल महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कारखान्याचा वीजपुरवठा बंद केला असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता अजितकुमार कागी यांनी दिली.महावितरणच्या या कारवाईमुळे कारखान्यातील पावणेदोनशे कुटुंबांतील साडेचारशे जणांना अंधारात राहावे लागणार होते. सायंकाळी कारखाना प्रशासनाने जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरू केला.
वसंतदादा कारखान्याची वीज तोडली
By admin | Updated: September 13, 2014 00:10 IST