घाटनांद्रे / जालिंदर शिंदे : कवठेमहंकाळ तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून वरूणराजाने चांगलीच कृपादृष्टी दाखवल्याने बळीराजाने नगदी पीक म्हणून ऊस लागवडीस मोठी पसंती दिली आहे. त्यामुळे तालुक्यात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, अपुऱ्या ऊसतोड मजुरांचा फटका बसत असून, शेतकरीवर्ग यांत्रिकीकरणाचा आधार घेताना दिसत आहे.
रांजणी, लोणारवाडी, अग्रण धुळगाव, कोकळे, नागज, कुची, कवठेमहंकाळ व परिसरात ऊस तोड नसल्यामुळे उसाला तुरे आले आहेत. त्यातच महाकांली साखर कारखाना बंद असल्याने ऊस कधी, कोठे व कसा पाठवायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. परिसरात ऊस तोड कामगार कमी प्रमाणात असल्यामुळे कर्नाटकातून मजूर आणावे लागत आहेत. तोडणी, मजुरांचे जेवण व इतर खर्च शेतकऱ्यांना करावा लागत सल्याने शेतकरी हतबल झाला होता.
त्यावर पर्याय म्हणून केंपवाड साखर कारखान्याने ऊस तोडणीसाठी यांत्रिक मशीनच पाठवल्याने ऊस तोडणी प्रक्रिया अगदी सुलभ व सोपी झाली आहे. कमी वेळेत व कमी खर्चात ऊसतोडीचे हे काम फत्ते होत आहे. या यंत्राद्वारे साधारणपणे एक एकर ऊस तोडणी सुमारे सहा तासांच्या आत पूर्ण होते. त्यासाठी मशीन भाडे ३००० रुपये व इतर खर्च १००० रुपये असे अंदाजे चार हजार रुपये इतका खर्च येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गामधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
फोटो ओळी:- रांजणी (ता. कवठेमहंकाळ) परिसरात यंत्राद्वारे सुरू ऊसतोड सुरू आहे.