अमित काळे -तासगाव -जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सलग सहाव्यांदा विजय नोंदवला. भाजपचे उमेदवार व माजी मंत्री अजितराव घोरपडेंना दोन्ही तालुक्यात आबांपेक्षा कमी मते मिळाली. भाजपने पंतप्रधान मोदींसह दिग्गजांच्या सभा घेऊन युध्दभूमी बनवलेल्या तासगावात राष्ट्रवादीने अखेरच्या टप्प्यात केलेला जबरदस्त प्रचार व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास यावर विजयश्री खेचून आणली.लोकसभा निवडणुकीत खा. संजयकाका पाटील यांना या मतदारसंघात तब्बल ४० हजारांचे मताधिक्य होते. नरेंद्र मोदी यांची लाट व भाजपला मिळालेले यश या पार्श्वभूमीवर अजितराव घोरपडे यांनी भाजपत प्रवेश केला. खा. संजयकाका व घोरपडे सरकारांनी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची बनवली होती. दुसऱ्या बाजूला माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडून मतदारसंघात केलेली विकासकामे, आरोग्य शिबिरे, पाणी योजना हे प्रमुख मुद्दे प्रचारात होते. भाजपकडून लावण्यात आलेली ताकद लक्षात घेता, ‘सर्वसामान्य लोक अडचणीच्या काळात पाठीशी ढाल म्हणून उभी राहतात’, हे आर. आर. पाटील यांनी मतदारांना केलेले आवाहन चांगलेच गाजले. मतदारसंघातील गावन्गाव त्यांनी पिंजून काढले होते. १९८९-९० मध्ये पहिल्यांदा विधानसभेत गेलेल्या आबांनी सलग सहाव्यांदा विजय मिळवला.आक्रमक प्रचाराचा फायदा अंतिम टप्प्यात झालेला प्रचार, शक्तिप्रदर्शन यामुळे आर. आर. पाटील यांच्याबाबतची हवा तयार झाली होती. तुलनेने भाजपचा जाहीर प्रचार शेवटच्या टप्प्यात दिसला नाही. सांगता सभाही झाली नाही आणि पदयात्राही निघाली नाही. याची चर्चा मात्र झाली. राष्ट्रवादीकडून अंतिम टप्प्यात करण्यात आलेल्या आक्रमक प्रचाराचा त्यांना फायदा झाला.
काकांच्या कुरघोड्यांनीच आर. आर. आबांना गुलाल
By admin | Updated: October 21, 2014 00:19 IST