लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील पूर ओसरल्यानंतर महापालिकेने स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले आहे. हजार ते दीड हजार कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छतेचा विडा उचलला आहे. शहरातील रस्ते, चौकांची स्वच्छता करून बुधवारी औषध फवारणी करण्यात आली. नागरिकांनी घरातील स्वच्छता मोहीमही हाती घेतली आहे.
सांगलीतील पुराने आता दम टाकला आहे. पूर ओसरलेल्या परिसराच्या स्वच्छतेबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांनी नियोजन केले होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अन्य महापालिका, स्वयंसेवी संस्थाही स्वच्छतेसाठी पुढे सरसावल्या होत्या. महापालिकेचे ८०० कर्मचारी, मुंबई व पिंपरी चिंचवड महापालिकेचे १८० कर्मचारी स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले होते.
सांगली बसस्थानक, झुलेलाल चौक, पत्रकार नगर परिसराची स्वच्छता करून औषध फवारणी करण्यात आली. स्टेशन चौक, रतनशी नगर, शंभरफुटी रस्ता, बसस्थानक रस्ता. कोल्हापूर रोड, गणेश नगर काही गल्ल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. ज्या भागात पाणी ओसरले आहे, तिथे स्वच्छता व औषध फवारणीला प्राधान्य देण्यात आले. टिंबर एरिया, गोकुळ नगर परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. महापालिकेचे अग्निशमन दलही स्वच्छतेसाठी मदतीला धावले आहे. अग्निशमन दलाचे प्रमुख चिंतामणी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रस्ते, चौकांची स्वच्छता केली जात आहे. अग्निशमन दलाच्या वाहनातून रस्त्यावर पाणी मारुन चिखल बाजूला केला जात आहे. दिवसभरात १५ वाहनांनी तब्बल १०० खेपा केल्या.
चौकट
बाजारपेठेतील रस्ते चकाचक
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गणपती पेठ, कापडपेठ, मेन रोड, हरभट रोड या परिसरातील रस्ते एका दिवसात चकाचक करण्यात आले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासूनच बाजारपेठेत स्वच्छता मोहीम राबविली. आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहूल रोकडे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डाॅ. रवींद्र ताटे यांनी स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली.
चौकट
चार पालिका धावल्या
पूर ओसरल्यानंतर शहर स्वच्छतेसाठी राज्यातील चार पालिका धावून आल्या आहेत. मुंबई महापालिकेने ८३ सफाई कर्मचाऱ्यांसह दोन वाहनांचा ताफा दाखल झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून १०० कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सातारा नगरपालिकेने दोन जेसीबी यंत्रे पाठविली आहेत. तर पुणे महापालिकेकडून जेटींग मशीन, सक्शन मशीनसह पाच अत्याधुनिक वाहने आली आहेत.
कोट
पूर ओसरल्यानंतर महापालिकेने स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी इतर महापालिकांची मदत होत आहे. येत्या तीन ते चार दिवसांत पूर्ण शहर स्वच्छ होईल. त्यादृष्टीने नियोजन केले आहे. - डाॅ. रवींद्र ताटे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.