सांगली : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षिकांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन विद्यार्थी, विद्यार्थिनी घडवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष विश्वनाथ मिरजकर होते.येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये आज सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्यावतीने २३ शिक्षिकांना ‘सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी १०२ शिक्षिकांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारही करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात होर्तीकर बोलत होत्या. यावेळी महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील, कवठेमहांकाळच्या सभापती वैशाली पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती गजानन कोठावळे, निरंतर विभागाच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, महापालिका महिला, बालकल्याण समितीच्या सभापती योजनाताई शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना होर्तीकर म्हणाल्या की, शिक्षकांची श्रीमंती ही त्यांचे विद्यार्थी असतात. विद्यार्थी मोठे झाले तरच भविष्यात शिक्षकांना मान मिळणार आहे. एकप्रकारे शिक्षकही विद्यार्थ्यांचे पालक ठरतात. यामुळे भविष्यातील चांगले नागरिक घडविण्याची मोठी जबाबदारी आजच्या शिक्षकांवर आहे. यासाठी सावित्रीबार्इंचा आदर्श घेऊन विशेषत: शिक्षिकांनी वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना विश्वनाथ मिरजकर म्हणाले की, ‘सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने शिक्षिकांना एका सन्मानाबरोबरच मोठी जबाबदारीही प्राप्त झाली आहे, ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणाने पार पाडावी, सेवानिंवृत्तांनीही आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करावा.यावेळी विवेक कांबळे, कोठावळे, वाघमोडे आदींनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत संपतराव चव्हाण यांनी केले, तर आभार बँकेचे उपाध्यक्ष माणिक आडके यांनी मानले. यावेळी बँकेचे अध्यक्ष महेश शरनाथे, राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हा नेते किसन पाटील, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सरचिटणीस बाबासाहेब लाड, शशिकांत भागवत, कार्यकारी संचालक एन. एस. पाटील यांच्यासह संचालक, शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)सत्ताधाऱ्यांकडून साखरपेरणीआजच्या मेळाव्यात २३ शिक्षिकांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर १०२ शिक्षकांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारही करण्यात आला. एवढ्या मोठ्याप्रमाणात सत्कार आणि गौरव करण्यात येणार असल्यामुळे नाट्यगृहात गर्दी झाली होती. आजच्या मेळाव्यामधून शिक्षक समितीने आपली ताकद दाखवून आगामी निवडणुकीची तयारी दाखवली. आजच्या मेळाव्यात त्याची साखरपेरणी शिक्षक समितीकडून करण्यात आली. आजच्या मेळाव्यासाठी पत्रकारांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांना बोलावण्यात आले होते. जिल्हा परिषदेतील सर्व पदाधिकारी, महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. मुख्य समारंभापेक्षा सत्काराचाही कार्यक्रम खूपच लांबला. कार्यक्रमास झालेली गर्दी पाहून शिक्षक समितीचे नेते, पदाधिकारी खूष झाल्याचे दिसून आले.
शिक्षिकांनी सावित्रीबार्इंचा आदर्श घ्यावा
By admin | Updated: February 15, 2015 23:48 IST