सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील संस्कार नंदी या अडीच वर्षाच्या चिमुरड्याचा घातपात झाल्याचा सांगली ग्रामीण पोलिसांचा संशय बळावला आहे. याप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. सर्व पुरावे हाती आल्यानंतरच याचा उलगडा करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. यासाठी सध्या अत्यंत गोपनीय तपास सुरू आहे. दरम्यान, घटनेदिवशी संस्कारचे वडील बेळगावात होते का, याची खात्री करण्यासाठी गेलेले पोलीस पथक आज (मंगळवार) परतले. ते त्यादिवशी तिथेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आठवड्यात संस्कार अचानक बेपत्ता झाला आणि त्याचा एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये मृतदेह आढळून आला होता. त्याच्या घरापासून सत्तर फूट अंतरावर हे बांधकाम सुरु होते. संस्कारच्या तोंडात वाळू सापडली होती. वाळू खाल्ल्याने श्वास गुदमरुन त्याचा मृत्यू होऊ शकतो, असे शवविच्छेदन तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि अडगळीच्या ठिकाणी जाऊन तो वाळू कसा खाईल? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. तसेच लहान मुलांना खायची वस्तू कोणती, हे चांगले समजते. त्यामुळे त्याला वाळू कोणी चारली आहे का? याचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी आज शवविच्छेदन तपासणी करणाऱ्या डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांशी संस्कारच्या मृत्यूबद्दल पुन्हा चर्चा केली. (प्रतिनिधी)
संस्कार नंदीच्या घातपाताचा संशय
By admin | Updated: August 5, 2014 23:20 IST