सांगली : कमी दराने साखरेची खरेदी करून बाजारात त्याची चढ्या दराने विक्री करून राज्यात ७ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. साखर कारखानदार आणि दलाल असलेल्या व्यापाऱ्यांनी संगनमताने हा घोटाळा केल्याने त्यांची चौकशी शासनाने करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, राज्यात साखरेच्या माध्यमातून सट्टा खेळला जात आहे. प्रति टन १९00 रुपयांनी साखरेची खरेदी करून बाजारात ती २५00 ते २६00 रुपयांनी विकली गेली. परराज्यात रेशनिंगच्या साखरेच्या निविदा ३२00 रुपयांनी भरण्यात आल्या. कमी दराने साखर खरेदी करून त्याची साठवणूक करून बाजारात चढ्या दराने त्याची विक्री करण्यात येत आहे. ज्यांनी साखरेची कमी दरात खरेदी करून नफेखोरीसाठी त्याचा वापर केला, अशा सर्व व्यापाऱ्यांची चौकशी करावी. डाळींचे भाव वाढल्यानंतर शासनाने ज्यापद्धतीने कारवाईची मोहीम हाती घेतली, तशीच मोहीम साखरेसाठी राबवावी. जे व्यापारी यामध्ये सापडतील, त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. कारखानदारही या साखळीत सामील आहेत. त्यांचीही चौकशी केली जावी. एकरकमी एफआरपी देणे कायद्यानेच बंधनकारक आहे. त्यामुळे ती प्रथम द्यावी आणि साखरेचे दर वाढले, तर रंगराजन समितीच्या शिफारशींप्रमाणे साखर व उपपदार्थ विक्रीतील रकमेचा ७0 टक्के हिस्सा शेतकऱ्यांना मिळायला हवा. हा कायदा किंवा त्यातील तरतुदी यांचा विचार न करता, अनेक नेते टीका करीत सुटले आहेत. त्यांना या कायद्याच्या प्रशिक्षणाची गरज आहे. राष्ट्रवादीचे जे नेते आमच्यावर टीका करीत आहेत, त्यांच्याच पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी रिकव्हरीचा बेस साडेआठ टक्क्यांवरून नऊ ते साडेनऊ टक्के केला. बारामतीच्या विकासाचे गोडवे सध्या गायिले जात असले तरी, राज्यातून आणि केंद्रातून दरोडा टाकून लुटलेला पैसा बारामतीच्या विकासाकरिता वापरण्यात आला आहे, अशी टीका केली. (प्रतिनिधी)
जयंतरावांनी लोणी खाल्ले... राजू शेट्टी यांनी ३ हजार प्रतिटन दर मागून २७०० रुपयांवर तडजोड केल्याचा आरोप जयंत पाटील करीत आहेत. त्यांनी केंद्राच्या पॅकेजमधून प्रत्येकी १४७ रुपये काढून घेतले, त्याचे काय? मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच हा प्रकार आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ४राज्य सहकारी बँकेने साखर पोत्याचे चालू तिमाही मूल्यांकन २0५0 रुपये केले आहे. हे मूल्यांकन चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे चुकीचे आहे. सध्याचा बाजारभाव विचारात घेऊन मूल्यांकन करावे, अशी मागणी खोत यांनी केली.
आंदोलनाची दिशा ठरणार येत्या ६ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेत एफआरपीप्रश्नी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. साखरेच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना आपली मते मांडण्याचे हे एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मत खोत यांनी व्यक्त केले.