सांगली : सोयाबीन दराला अनेक कारणांनी घसरण सहन करावी लागत आहे. हमीभावापेक्षा सध्या दुप्पट दर असला, तरी गेल्या महिन्याभरात सुमारे दीड हजार रुपयांची प्रतिक्विंटल घसरण झाली आहे. हे दर आणखी किती खाली जाणार, याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे काही दिवसांपूर्वी बारा लाख मेट्रिक टन सोयापेंड आयातीस परवानगी मिळाल्यानंतर लगेच बाजारात सोयाबीन दरामध्ये घसरण सुरू झाली आहे. आयात शुल्कात केलेली घटही दर घसरणीस कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे बारा हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचलेला सोयाबीनचा आता दर ८ हजारांपर्यंत खाली आला आहे. नवा माल बाजारात येण्यापूर्वी उत्पादकांच्या डोईवर चिंतेचे ढग दाटले आहेत.
केंद्र शासनाने २०२१-२२ करिता सोयाबीनचा हमीभाव मागील वर्षाच्या तुलनेत ७० रुपयांनी वाढवून तीन हजार ९५० रुपये इतका जाहीर केला आहे. सध्या हमीभावापेक्षा अधिक आहे. तरीही ही घसरण आणखी खाली आली, तर शेतकऱ्यांच्या पदरातील लाभ घटणार आहे.
सांगलीच्या बाजारात सोमवारी निघालेल्या सौद्यात सोयाबीनला किमान ६ हजार ७००, तर कमाल ७ हजार ५०० प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे. सरासरी ७ हजार १०० इतका दर मिळाला. गेल्या महिन्याभरात सरासरी दरात दीड हजार रुपयांची घट झाल्याचे दिसत आहे.
चौकट
अशी होतेय दरात घसरण (प्रतिक्विंटल रुपये)
तारीख सरासरी दर
२५ ऑगस्ट ८,५३०
११ सप्टेंबर ८,२५०
१७ सप्टेंबर ७,५००
१८ सप्टेंबर ७, २५०
२० सप्टेंबर ७,१००
चौकट
धोरणांचा विपरित परिणाम
सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश अव्वल असून, त्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ३५ टक्क्यांवर आहे. त्यामुळे सोयाबीनच्या धोरणांचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम होत असतो. आता दरातील घसरणीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे.