सांगली : हरित न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापनाबाबत महापालिकेला फटकारले असतानाही, त्यातून सत्ताधारी व प्रशासनाने काहीच शहाणपण घेतल्याचे दिसून येत नाही. बुधवारी घनकचरा व्यवस्थापनाबाबत आयोजित सादरीकरणाला निमंत्रण नसल्याने महापौर विवेक कांबळे गैरहजर राहिले. त्यातून मानापमान नाट्य रंगले आहे. आयुक्त अजिज कारचे यांनी चूक केली असून त्यात सुधारणा करावी, असा चिमटा महापौरांनी पत्रकारांशी बोलताना काढला. घनकचरा व्यवस्थापनाबाबत हरित न्यायालयाने पंधरा दिवसात ६० कोटी रुपये विभागीय आयुक्तांकडे डिपॉझिट भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने घनकचऱ्याबाबत गंभीरपणे पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. आज पालिकेत एसीसी सिमेंट कंपनीच्या प्रतिनिधींनी कचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पाचे सादरीकरण आयोजित केले होते. पालिकेतील कचरा व्यवस्थापनात एसीसी कंपनीने रस दाखविला आहे. या बैठकीला उपमहापौर प्रशांत पाटील, स्थायी समिती सभापती संजय मेंढे, गटनेते किशोर जामदार, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज, नगरसेवक संतोष पाटील, आयुक्त अजिज कारचे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते. रितसर निमंत्रण नसल्याने महापौरांनी या सादरीकरणाकडे पाठ फिरविली. त्याबाबत महापौर कांबळे म्हणाले की, प्रशासनाच्यावतीने घनकचरा बैठकीसाठी कोणतीही सूचना आलेली नव्हती. त्यांनी प्रोटोकॉलनुसार महापौर, उपमहापौरांना पत्र पाठविण्याची गरज होती. आयुक्तांनी ही चूक केली असून त्यात निश्चितच सुधारणा व्हावी. अन्यथा त्यांचेही प्रशिक्षण घ्यावे लागेल, असा टोला त्यांनी लगाविला. (प्रतिनिधी)काय आहे प्रकल्पमहापालिका हद्दीत एसीसी कंपनीकडून प्रकल्प उभा केला जाईल. कंपनीतर्फे ३० टक्के गुंतवणूक होईल. उर्वरित ७० टक्के निधी केंद्र शासनाकडून मिळेल. या प्रकल्पाचा डीपीआरसुद्धा केंद्र शासनाच्या पॅनेलवरील संस्थेकडूनच तयार केला जाईल. त्यामुळे पालिकेला एक रुपयाचीही तोशिष लागणार नाही. कचऱ्यापासून जळाऊ विटा तयार केल्या जातील. त्यावरील रॉयल्टीची रक्कम महापालिकेला मिळेल. पालिकेला केवळ दररोजचा कचरा आणि प्रकल्पासाठी जागा द्यावी लागणार आहे. घनकचरा प्रकल्पाला कोणाचाच विरोध नाही. या प्रकल्पाबाबत सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊ. महापालिकेच्या हिताचा प्रकल्प असल्यास निश्चित त्याला पाठिंबा देऊ. - विवेक कांबळे, महापौर ५प्रशासनाने महापौरांना दूरध्वनीवरून निरोप दिला होता. पालिका बरखास्त करण्याची वेळ आली असताना, कचराप्रश्नी मानापमान बघत बसले आहेत, हा प्रकार दुर्दैवी आहे.- दिग्विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते
घनकचऱ्यावरून मानापमान
By admin | Updated: April 10, 2015 00:37 IST