लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिक्षणाच्या इतिहासात सुमारे दीड वर्षाची प्रदीर्घ सुटी पहिल्यांदाच मिळाली आहे. याचा पुरेपूर फायदा घराघरातील चिमुकली उठवत आहेत. शाळेच्या कटकटीपासून शंभर टक्के मुक्तता मिळाल्याने आळसावली आहेत. अभ्यासाचा तर अजिबात विसर पडला आहे.
ज्यांच्या मुलांनी शाळेचा उंबरठा नुकताच ओलांडला आहे, त्या पालकांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरली आहे. शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवण्यापूर्वीच मुले उन्हाळी, पावसाळी आणि सणासुदीच्या सुट्ट्या एन्जॉय करीत आहेत. तब्बल ५०० दिवस घरात राहिलेल्या मुलांना अभ्यास पुन्हा आठवणार काय ही बाब डोकेदुखीची ठरली आहे. एरवी मुले दिवसभर शाळेत अभ्यासाच्या संपर्कात राहिल्याने संध्याकाळी खेळायला मुक्तता असायची. आता मात्र सकाळपासूनच मुक्त अवस्थेत असतात. पाचवीपासूनचा अभ्यास मोबाईलवर होतो, पण पहिली ते चौथीच्या चिमुरड्यांना मात्र कोणतीच बंधने नाहीत. त्यांचा सुट्टीचा मूड संपणार तरी कधी याची चिंता पालकांना लागून राहिली आहे.
बॉक्स
आई-बाबांनीच व्हावे आता गुरुजी
- या प्रदीर्घ सुट्टीच्या काळात आता आई-बाबांनीच गुरुजी व्हावे असा शहाणपणाचा व व्यवहारी सल्ला शिक्षणतज्ज्ञांनी दिला आहे.
- मुलांचे अभ्यासाचे वळण मोडू नये यासाठी दिवसभरात किमान तीन-चार तास मुलाच्या अभ्यासासाठी देण्याची गरज आहे.
- मुलाच्या क्षमतेनुसार अंकगणिते, सामान्यज्ञान, मराठी भाषा, चित्रकला आदी विषयांत त्यांना गुंतवून ठेवता येईल. अगदी मोबाईलवरही मनोरंजनातून शिक्षणाचा प्रवाह कायम ठेवता येईल.
बॉक्स
शाळा बंद आहे, तर अभ्यास कशासाठी?
- शाळा बंद असल्याने मुले स्वैर बनली आहेत. शाळा बंद आहे, तर अभ्यास कशासाठी हा त्यांचा प्रश्न पालकांना निरुत्तर करीत आहे.
- सकाळी उशिरापर्यंत झोपायचे, निवांत आवराआवर करायची आणि टिव्हीसमोर ठाण मांडायचे हे त्यांचे दैनंदिन वेळापत्रक आहे.
- कामावर जाणाऱ्या पालकांची मुले तर आणखी निवांत आहेत. मोबाईल आणि टिव्ही हेच त्यांचे वर्गमित्र ठरले आहेत.
- काही सजग पालकांनी मुलांचा अभ्यासाशी संपर्क कायम ठेवला आहे. त्यांचे किमान प्राथमिक शिक्षण सुरू राहील याची दक्षता घेतली आहे.
- मोठ्या भाऊ-बहिणीच्या ऑनलाईन शिक्षणातूही काही मुले शिक्षणाचे थोडेफार धडे घेत आहेत.
बॉक्स
पहिलीची ओळखच नाही, अन थेट दुसरीच्या वर्गात
- लॉकडाऊनमुळे वर्षभर शाळा बंद राहिली. मुलांना परीक्षा न घेताच थेट वरच्या वर्गात वर्गोन्नत करण्यात आले.
- गेल्या मार्चमध्ये पहिलीत प्रवेश घेतलेली मुले यामुळे प्रत्यक्ष शाळेत जाऊ शकली नाहीत, यंदा त्यांना थेट दुसरीत प्रवेश मिळाला आहे.
- पहिली-दुसरीत अक्षरओळख होते, पण शाळा बंद असल्याने अबकड आणि एबीसीडी मुलांच्या डोक्यात शिरलेली नाही.
कोट
शाळा सुरू असताना सकाळी-संध्याकाळी तास-दोन तास मुलांचा अभ्यास घेत होते. पण गेले दीड वर्ष मुले घरीच आहेत. त्यांचे दैनंदिन वेळापत्रक विस्कटले आहे. दिवसभर खेळण्याने अभ्यासाकडे लक्ष नसते.
- कविता मगदूम, मिरज
शासनाने कोरोनाची तीव्रता कमी असलेल्या गावांत वर्ग सुरू करावेत. रविवार वगळता अन्य सर्व सुट्ट्या रद्द कराव्यात. सुट्टीचे दीड वर्ष भरून काढावे. मुलांचे शैक्षणिक नुकसान न भरून येणारे आहे.
- अशोक रणदिवे, माधवनगर.
पॉईंटर्स
वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली ३९,५२६, दुसरी ४२,६२७, तिसरी ४३,६५८, चौथी ४३,६१५
-