सांगली : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सांगली, मिरजेतील बुधवारच्या दौऱ्यावेळी भाजपचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दांडी मारल्याने दोन्ही पक्षांतील स्थानिक पातळीवर असलेला सवतासुभा स्पष्ट झाला आहे. भाजप मंत्र्यांच्या दौऱ्यावेळीही शिवसेनेचे आमदार, पदाधिकारी किंवा कार्यकर्ते उपस्थित राहात नसल्याचे दिसून आले आहे. राज्यातील राजकारणाचे हे पडसाद असल्याची चर्चा रंगली आहे. उद्योगमंत्री देसाई यांनी सांगली, मिरजेतील कार्यक्रमांना बुधवारी हजेरी लावली. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत. युतीचे मंत्री म्हणून देसाई यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, हा राजकीय शिष्टाचाराचा भाग होता. मात्र दोन्हीही आमदारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे टाळले. आ. सुरेश खाडे यांनी देसार्इंच्या मिरज एमआयडीसीमधील कार्यक्रमाला दांडी मारली. वास्तविक उद्योजकांच्या प्रश्नावर त्यांनीही यापूर्वी पाठपुरावा केला होता. त्यामुळे ते किमान उद्योजकांचे ऋणानुबंध जपण्यासाठी या कार्यक्रमाला हजर राहतील, अशी शक्यता वाटत होती, मात्र तसे घडले नाही. देसाई यांचा सांगलीतही कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाही शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांशिवाय भाजपचे कोणीही उपस्थित नव्हते. देसाई यांनी सांगलीतील कार्यक्रमातच, उध्दव ठाकरे यांच्या भाजपविरोधी वक्तव्याला पाठिंबा दिल्यास या रुसव्यात भर पडणार आहे. एकूणच राज्यातील राजकारणाचेच पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटत असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे असल्याने त्यांच्याही दौऱ्यावेळी शिवसेना पदाधिकारी, नेते फटकून असतात. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचाही सांगली, मिरजेला नुकताच दौरा झाला. तेही भाजपचे असल्याने, त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा शिष्टाचार शिवसेना नेत्यांनी पाळला नाही. त्यांच्याही दौऱ्यावेळी केवळ भाजपचेच नेते आणि पदाधिकारी दिसत होते. दोन्ही पक्षांमधील हा सवतासुधा आता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील नेते एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करू लागले की, स्थानिक पातळीवरील या रुसव्यात अधिकच भर पडत आहे. त्यामुळेच युतीचे मंत्री असूनही दोन्ही पक्षांनी उघडपणे सवतासुभा मांडला आहे. (प्रतिनिधी)
'सांगलीत सेना-भाजप नेत्यांमध्ये सवतासुभा
By admin | Updated: February 13, 2015 00:49 IST