कडेगाव : चिंचणी अंबक (ता. कडेगाव) येथील सागर सुदाम थोरात याने मोलमजुरी करून शिक्षण घेतले आणि एम.एस्सी. (रसायनशास्त्र) या विषयात सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकाविले. याबरोबरच राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) मध्ये उत्तीर्ण होऊन देशात पन्नासावा क्रमांक मिळविला.सागरचे आई, वडील शेतमजुरी करतात. कुटुंबाचा खर्च भागवून उच्च शिक्षण घेणाऱ्या सागरला आर्थिक मदत करणे आई-वडिलांनाही अशक्य झाले होते. सागरने चिंचणी येथील शिवाजी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन पुढे बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण कृष्णा महाविद्यालय रेठरे (बु., ता. कऱ्हाड) येथे घेतले. त्याच्याकडे महाविद्यालयाचे शुल्क, प्रवास खर्च, वह्या आणि पुस्तके घेण्यासाठीही पैसे नव्हते. परंतु शिकण्याची उमेद असलेल्या सागरने चिंचणी येथील औषधाच्या दुकानात मजुरी करून बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण घेतले. बी.एस्सी.ला प्रथम क्रमांक मिळवून सागर एम.एस्सी.साठी सोलापूर विद्यापीठात गेला. गुणवंत विद्यार्थ्यासाठी असलेली ‘एकलव्य शिष्यवृत्ती’ सागरला मिळत होती. याशिवाय सोलापूर येथेही सागरने मोलमजुरी करून शिक्षणाचा खर्च भागवला. त्याने २०१४ च्या एम.एस्सी. परीक्षेत सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नुकत्याच झालेल्या पदवीदान समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याहस्ते सागरला सोलापूर विद्यापीठाचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. त्यानंतर २१ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) त्याने देशात पन्नासावा क्रमांक मिळविला. आता सागर वरिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयासाठी प्रोफेसर होण्यास पात्र झाला आहे. यापुढे प्रोफेसर म्हणून नोकरी करीत तो पीएच.डी. करणार आहे. काबाडकष्ट करीत शिक्षणात उज्ज्वल यश मिळविणाऱ्या सागरचे चिंचणी व परिसरातून कौतुक होत आहे. (वार्ताहर)आई-वडिलांचे परिश्रमसागरचे आई-वडील दररोज शेतमजुरी करून शक्य तितके पैसे सागरला देत होते. सागर नेट परीक्षा उत्तीर्ण झाला. सोलापूर विद्यापीठात प्रथम आला. या आनंदात आई-वडील अद्यापही मोलमजुरी करीत आहेत. सागरला चांगली नोकरी लागली आणि पगार मिळू लागल्यावरही कष्ट करायचेच, चांगले घर बांधायचे, या स्वप्नपूर्तीसाठी ते काबाडकष्ट करीत आहेत.
चिंचणीच्या सागर थोरातची गरुडभरारी
By admin | Updated: April 10, 2015 23:51 IST