विटा : सांगली जिल्ह्यात सुवर्णनगरी म्हणून परिचित असलेल्या वाढत्या विटा शहरात अपार्टमेंटचीही संख्या वेगाने वाढली आहे. या अपार्टमेंटमध्ये इमारत मालकांनी मोठ्या प्रमाणावर भाडेकरू ठेवले असले तरी, या भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलिसांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणारे इमारत मालक आता विटा पोलिसांच्या रडारवर आले आहेत. शहरातील अपार्टमेंट व कच्च्या-पक्क्या साध्या घरात भाडेकरूंना आसरा दिलेल्या मालकांवर पोलिसांनी ‘वॉच’ ठेवला असून भाडेकरूंची माहिती लपविणाऱ्या इमारत मालकांवर आता पोलिसांत गुन्हे दाखल होणार आहेत.सांगली जिल्ह्यासह विटा शहरातील वाढते गुन्हे रोखणे किंवा झालेल्या गुन्ह्यांच्या तपास कामात मदत व्हावी यासह काही महत्त्वपूर्ण कारणांसाठी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. दिलीप सावंत यांनी शहरातील भाडेकरूंची माहिती संकलित करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाडेकरूंचीही माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. शहरातील गावठाणसह उपनगरांत मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्सची उभारणी करण्यात आली आहे. विट्यात तयार करण्यात आलेली अपार्टमेंट ही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून उभारण्यात आली आहेत. या इमारतीतील फ्लॅटमध्ये भाडेकरूंना आश्रय देण्यात आला आहे. त्यात अनेक परप्रांतीय लोकांचाही समावेश आहे. परंतु, या भाडेकरूंचे पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आदीसह त्यांची सर्व माहिती पोलिसांना देणे इमारत मालकांवर बंधनकारक असतानाही, शहरातील अनेक इमारत मालकांनी आपापल्या भाडेकरूंची माहिती पोलिसांना सादर केलेली नाही. याचाच एक भाग म्हणून रविवारी रात्री विटा येथील खानापूर रस्त्यावरील शिवदर्शन इमारतीचे मालक अशोक जाधव यांच्यावर, भाडेकरूंची माहिती लपवून ठेवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विटा शहरात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्यांवर पोलिसांत पहिला गुन्हा दाखल झाल्याने अन्य इमारत मालकांत प्रचंड खळबळ उडाली आहे. भवानीमाळ, नेवरी नाका, संभाजीनगर, विवेकानंदनगर, यशवंतनगर, कदमवाडा, घुमटमाळ, मायणी रोड, साळशिंगे रस्ता, लेंगरे रस्ता, जुना वासुंबे रोड यासह अन्य उपनगरांतील इमारत मालकांनी त्यांच्याकडील भाडेकरूंची माहिती संकलित करून, विटा पोलीस ठाण्यातील विहित नमुन्यातील अर्जात भरून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. (वार्ताहर)
भाडेकरूंचे घरमालक पोलिसांच्या रडारवर
By admin | Updated: December 29, 2014 23:53 IST