सांगली : प्रदीर्घ विचारमंथन करून, विरोधकांच्या सर्व आक्षेपांचे निरसन करून राज्य शासनाने सुरु केलेल्या जनुक बदल (जीएम) वाणांच्या संरक्षित शेतचाचण्या स्थगित ठेवण्याचा निर्णय झाला आहे. यामागे शेती आणि जैव तंत्रज्ञानाची काहीही माहिती नसणाऱ्या मान्यवर व्यक्ती व कीटकनाशके विक्री करणाऱ्या लॉबीचा हात आहे. शेतीच्या विकासासाठी या चाचण्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते अजित नरदे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीने सर्वांगीण विचार करुन, जनुक बदल वाणांची चाचणी करावी, अशी शिफारस महाराष्ट्र शासनाला केली होती. या शिफारशीनंतर चाचण्यांना परवानगीही मिळाली होती. तथापी शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान मिळाले, तर कीटकनाशक खपात प्रचंड घट होऊन नुकसान होण्याची भीती असल्याने कीटकनाशक लॉबीने याला विरोध केला, म्हणून याला स्थगिती मिळाली. जैव तंत्रज्ञान व शेतीशी काहीही संबंध नसलेल्या पर्यावरणवाद्यांना पुढे करून चाचण्यांना विरोध करण्यात येत आहे. ते म्हणाले की, श्रीमती दिलनवाय वारिअवा या मुंबईतील व्यावसायिकांचा शेतीशी संबंध नसताना, काही मान्यवर मंडळींना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व या चाचण्यांना बंदी घालण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी यावर बंदी आणली आहे. या शिष्टमंडळामध्ये युजीसीच्या माजी अध्यक्षा श्रीमती अरमैत्य देसाई, डॉ. असद रहमानी, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश सुजाता मनोहर, माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो, माजी मुख्य सचिव व्ही. रंगनाथन् आदींचा समावेश होता. यावेळी संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष संजय कोले, जिल्हाध्यक्ष शीतल राजोबा, अनिल पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) शेतीचा विकास खुंटणार ऐन खरिपाच्या तोंडावर चाचण्या थांबविण्यात कीटकनाशक लॉबी यशस्वी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास आणखी एक वर्ष विलंब होणार आहे. त्यामुळे शेतीचा विकास पुन्हा खुंटणार आहे. त्यामुळे जीएम वाणांच्या चाचण्या सुरू कराव्यात.
कीटकनाशक लॉबीचा जीएम चाचण्यांना विरोध
By admin | Updated: August 9, 2015 00:47 IST