आटपाडी : शासनाने आता दुष्काळी भागातील लोकांचा अंत पाहू नये. राज्यकर्त्यांनी दिल्लीत ताकद लावून राज्य आणि केंद्र शासनाने तातडीने निधी देऊन दुष्काळी भागातील सिंचन योजना पूर्ण कराव्यात. राज्यकर्त्यांनी दुष्काळी भागाचं दुखणं संपविलं नाही, तर त्यासाठी दुष्काळग्रस्त जनता राज्यात सत्तांतर घडवेल, तसेच टेंभू योजनेचा केंद्र शासनाच्या एआयबीपी योजनेत समावेश करण्यासाठी दिल्लीला धडक देण्याचा इशारा हुतात्मा किसन संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी दिला.शेतमजूर कष्टकरी-शेतकरी संघटना पाणी संघर्ष चळवळीच्यावतीने आटपाडीत भवानी हायस्कूलच्या मैदानावर आज (गुरुवारी) २१ व्या विजयी पाणी संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले. टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तलावासह तालुक्यातील काही तलावांत पोहोचल्याबद्दल येथील व्यापारी पेठेतून वैभव नायकवडी यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. बसस्थानकापासून मिरवणुकीपुढे दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत मोठ्या संख्येने तरुण दुचाकीसह सामील झाले.परिषदेत नायकवडी म्हणाले, आता आटपाडी तलावापर्यंत आणि बुध्दिहाळ तलावात म्हणजे सांगोला तालुक्यात पाणी पोहोचले आहे. शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळेपर्यंत चळवळीच्यावतीने रेटा लावला जाईल. याआधीच पाणी आले असते, पण सरकारने निधीबाबत अनेकवेळा हात आखडता घेतला. अनुशेषाचे कारण सांगितले तर या भागाला आलेला निधी दुसऱ्यांनीच पळविला. आता टेंभूसाठी शासनाने मंजूर केलेला निधी तातडीने खात्यावर वर्ग केला पाहिजे. त्यातही आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील कामासाठी जास्त निधी दिला गेला पाहिजे. टेंभूचा केंद्र शासनाच्या एआयबीपी योजनेत समावेश झाला, अशी चुकीची माहिती नेत्यांनी सांगून दिशाभूल केली. नागनाथअण्णांनी जे स्वप्न बघितलं, ते पूर्ण करण्यासाठी साद द्या, असे आवाहन त्यांनी केले.गणपतराव देशमुख म्हणाले, नागनाथअण्णांनी चळवळ हाती घेतली नसती, तर सरकारने दुष्काळी भागासाठी प्रकल्प हाती घेतला नसता.यंदा कर्नाटक सरकारने पाटबंधारे विभागासाठी १६ हजार कोटींची तरतूद केली आहे, तर महाराष्ट्र शासन गेल्या तीन ते चार वर्षांत ५ हजार कोटींपेक्षा जादा तरतूद करीत नाही. आंध्रप्रदेशप्रमाणे शासनाने पाटबंधारेच्या जमिनी विकून प्रकल्प पूर्ण केले पाहिजेत. पाटबंधारेकडील १० टक्के जमिनी विकल्या तरी ६० हजार कोटींत मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प पूर्ण होतील. राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून तेरा दुष्काळी तालुक्यातील प्रश्न सोडवावेत. दर सहा महिन्याला बैठक घेऊन दुष्काळी भागातील जनतेचे दु:ख हलके करावे. यावेळी प्रा. डॉ. बाबूराव गुरव, बाळासाहेब नायकवडी, प्रा. आर. एम. चोपडे, उस्मान नबी शेख, प्रा. शिवाजीराव काळुंगे, शिवाजीराव पाटील, बाळासाहेब बागवान, सभापती ताई मिसाळ, प्रा. विश्वंभर बाबर, दादासाहेब ढेरे, जालिंदर जमदाडे, हणमंतराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, प्रा. पी. एन. देशमुख, सावंता पुसावळे, नानासाहेब राणे यांची भाषणे झाली. परिषदेस सुवर्णा देशमुख, सभापती अलका भोसले, डॉ. सुषमा नायकवडी, गौरव नायकवडी, भगवान पाटील, जयवंत अहिर, बळी भोरे, पं. स. सदस्य भागवत माळी, सुनीता गायकवाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)
टेंभूच्या निधीसाठी दिल्लीपर्यंत धडक देणार
By admin | Updated: June 27, 2014 00:44 IST