गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषदेच्या मुलींची शाळेची इमारत तेरा वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. परंतु मुलींना तेथे जाण्या-येण्याचा मार्ग असुरक्षित, धोकादायक, गलिच्छ, व्यसनाधीन लोकांच्या वावराचा आहे. त्या इमारतीत शाळा न भरविण्यासाठी कित्येक वर्षांपासून विरोध आहे. नुकत्याच झालेल्या पालक मेळाव्यातही पालकांनी विरोध दर्शविला असतानाही शाळा तेथे नेण्यात आली असून, पालकांनी विरोध केला आहे.
येथे मुलांची शाळा गोटखिंडी-आष्टा रस्त्यावर आहे, तर मुलींची शाळा हनुमान मंदिराजवळ आहे. ती जुनी असल्याने १३ वर्षांपूर्वी गावाच्या पूर्वेस जुना गंजीखाना परिसरात उमारत बांधण्यात आली. परंतु ती गावापासून लांब, धोकादायक व असुरक्षित असल्याने पालकांना तेथे स्थलांतर करण्याबाबत विरोध आहे. लॉकडाऊननंतर शाळा सुरू झाल्याने मुलींची ही शाळा स्थलांतर करण्यासाठी दि. १५ रोजी पालक मेळावा झाला. त्यात स्थलांतरास विरोध करण्यात आला असतानाही शाळेचे स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त करत स्थलांतर रद्द करण्याबाबत निवेदन दिले आहे. स्थलांतर रोखले नाही, तर उपोषण करू, अशा आशयाच्या निवेदनावर ६० पालकांच्या स्वाक्षरी आहेत.