सदानंद औंधे-- मिरज --मिरज : शासकीय रुग्णालयांप्रमाणे खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचाराचे दरफलक लावण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालकांनी दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी रुग्णालयात उपचारखर्चाचे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले असून, उपचारखर्चाचे फलक न लावणाऱ्या रुग्णालयचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. खासगी डॉक्टरांच्या उपचारखर्चावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने रुग्णावर उपचार केल्यानंतर मनमानी पध्दतीने भरमसाट बिलाची आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक वैद्यकतज्ज्ञांचा उपचारखर्च वेगवेगळा असल्याने उपचारानंतर बिलावरून डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाईकांत वादावादीचे प्रकार घडत आहेत. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेची सुनावणी करताना न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. डी. केंद्रे यांच्या खंडपीठाने खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्याला उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची आगाऊ कल्पना द्यावी, त्यासाठी विविध आजारांवरील खर्चाचा फलक प्रामाणिकपणे रुग्णालयांच्या भिंतीवर लावण्यात यावा, अशी ताकीद आरोग्य विभागाला दिली आहे. खासगी डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवेवर नियंत्रण ठेवणारा बॉम्बे नर्सिंग अॅक्ट हा कायदा राज्यात अस्तित्वात आहे. वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांच्या लुबाडणुकीस प्रतिबंध करणारा ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट’ हा नवीन कायदा केंद्र शासनाने मंजूर केला आहे. या कायद्यातील तरतुदीस इंडियन मेडिकल असोसिएशन या खासगी डॉक्टरांच्या संघटनेने आक्षेप घेतल्याने हा कायदा राज्यात अद्याप लागू करण्यात आलेला नाही. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे खासगी डॉक्टरांना उपचारखर्चाचे फलक लावावे लागणार आहेत. आदेशानुसार खासगी डॉक्टरांनी वैद्यकीय सेवेच्या खर्चाची किती आकारणी करावी, याचे बंधन नाही.शस्त्रक्रियांच्या दराबाबतही सूचना उपचार खर्च फलकाच्या सक्तीबाबत मिरज इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय कुरेशी यांच्याशी संपर्क साधला असता, बाह्यरुग्ण विभागातील केसपेपर व तपासणी खर्चाचे फलक सर्व रुग्णालयांत लावण्यात आलेले आहेत. मात्र वेगवेगळ्या शस्त्रक्रियांचा उपचारखर्च अगोदर सांगता येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘कट प्रॅक्टीसच्या तक्रारी महानगरातील मोठ्या हॉस्पिटलबाबत आहेत. छोट्या शहरात प्रमाणिकपणे रुग्णसेवा करण्यात येत असल्याचेही डॉ. कुरेशी यांनी सांगितले.तपासण्यांसाठी सक्ती नाहीरुग्णांच्या वैद्यकीय तपासण्यांची आवश्यकता नसतानाही तपासण्यांची सक्ती करून बिलाची वसुली करण्यात येते. रुग्णालयात असलेल्या औषध दुकानांतूनच औषधे खरेदी करण्याची व रुग्णालयातीलच प्रयोगशाळेतूनच सर्व चाचण्या व तपासण्यांची, क्ष-किरण, सोनोग्राफी करून घेण्याची सक्ती करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. रुग्णांना अनावश्यक वैद्यकीय तपासण्यांची सक्ती करण्यात येऊ नये व उपचार दरफलक लावण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, असे आरोग्य उपसंचालकांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
आरोग्य विभागाचा आदेश : फलक न लावल्यास कारवाईचा इशारा, खर्चाची आगाऊ कल्पना देण्याचेही बंधन
By admin | Updated: September 11, 2014 00:08 IST