वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी, मुख्याधिकारी व आपण स्वत: एकत्रित येऊन प्रभावीपणे स्वच्छता मोहिम राबविली. चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे या कामाचे खरे शिल्पकार आहेत. स्वच्छता मोहिमेत वेंगुर्ले नगरपरिषदेला आतापर्यंत मिळालेले तिन्ही पुरस्कार नागरिकांच्या सक्रीय सहभागाने मिळाले असून यापुढेही स्वच्छ अभियानात नागरिकांचे असेच सहकार्य मिळेल याची खात्री आहे. वेंगुर्ले नगरपालिकेला स्वच्छता मोहिम अभियानात आतापर्यंत मिळालेल्या तीन पुरस्कारांमधून दीड कोटी रुपये बक्षिसाच्या स्वरुपात मिळाले आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांच्यावतीने देण्यात येणारा वसुंधरा पुरस्कार २0१६ यावर्षी वेंगुर्ले नगरपरिषदेने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्विकारल्यानंतर वेंगुर्लेत शुक्रवारी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी पुरस्कार व विविध विकास योजनांसंदर्भात माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा नार्वेकर, नगरसेवक वामन कांबळे, यशवंत परब, अभि वेंगुर्लेकर, अॅड. सुषमा खानोलकर आदी उपस्थित होते. शहरातील विकास कामासंबंधी माहिती देताना नगराध्यक्ष कुबल म्हणाले की, वेंगुर्ले मच्छिमार्केटच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मच्छिमार्केटच्या बांधकामासाठी मत्स्योद्योग मंडळाकडून २ कोटी ३५ लाखांचा निधी मिळाला असून लवकरच मच्छिमार्केटचे बांधकाम सुरु होणार आहे. तत्पूर्वी संबधित व्यापारी व मच्छिमार यांची बैठक घेण्यात येणार आहे. बहुचर्चित कांडी कोळसा प्रकल्प हा सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने मंजूर होऊन माझ्या काळात तो पूर्णत्वास आलेला आहे. सदरचा प्रकल्प हा सर्व शहरांसाठी आदर्शवत असून याचे उद्घाटन या महिन्याच्या अखेरीस करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सुसज्ज अग्निशामक केंद्र, स्टाफ क्वार्टर्स आदी प्रलंबित कामे पूर्ण झाले असून त्याचेही उद्घाटन कोळसाकांडी प्रकल्पाबरोबर केले जाईल.वेंगुर्ले शहरासाठी १६ लाख रुपये किंमतीची दोन फायर बुलेट खरेदी करण्यात आली असून ज्या ठिकाणी मोठा बंब जात नाही, जेथे अरुंद रस्ते आहेत त्या भागात आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी सदर फायर बुलेट प्रभावीपणे काम करतात. सर्व सुसज्ज यंत्रणेसह असलेल्या या फायर बुलेटने आतापर्यंत नाना-नानी पार्क व म्हाडा कॉलनी येथे लागलेल्या आगी आटोक्यात आणल्या आहेत. त्यामुळे पाण्याचीही बचत होण्यास मदत होत आहे. शहरातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे वेगवेगळे समारंभ, नाटक, करमणुकीचे कार्यक्रम किवा सभा यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या मागे नगरपरिषदेचा बहुउद्देशीय हॉल लवकरच उभारण्यात येणार असून त्यासाठी ५ कोटी रुपये निधी मिळाला आहे, अशी माहिती कुबल यांनी दिली. मुंबई येथील झालेल्या बैठकीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी १८ लाख रुपये किंमतीचा टँकर घेण्यासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेला निधी देण्याचे कबूल केले आहे. (प्रतिनिधी)एक हजार झाडे लावणार४गेल्यावर्षी नगरपरिषदेतर्फे शहरातील विविध भागात १७५0 झाडे लावण्यात आली होती. त्यामधील १७00 झाडे जगविण्यात नगरपरिषदेला यश आले आहे. यावर्षी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त १ जुलै रोजी महाराष्ट्रामध्ये २ कोटी झाडे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. ४त्यांना आमची साथ व काळाची गरज म्हणून वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे १000 झाडे लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. वेंगुर्ले शहरातील नागरिकांनी याला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी पत्रकार परिषदेत केले.
विद्यार्थ्यांच्या पाठीवर दीड किलोचेच दफ्तर!
By admin | Updated: June 11, 2016 00:49 IST