शंकर पोळ -कोपर्डे हवेली -‘पाणी म्हणजे जीवन’ या उक्तीप्रमाणे शेतकरी आपली जिरायत शेती ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शेतीला पाणी मिळावे, यासाठी अनेक शेतकऱ्यांचा बोअर व विहीर खोदण्याकडे कल असतो. त्यासाठी भूगर्भातील पाणी शोधण्याची सुपारी पाणाड्याला दिली जाते. पाणाडीही भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करतात. दरवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत पाणाडी व बोअर व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत असतो. मात्र, सध्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांनी बोअर, विहीर खुदाईकडे पाठ फिरविल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे.मार्च ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमिनीतील भूजल पातळी खालावली जाते. त्यावेळी शेतकरी जमिनीतील पाणी पातळी पाहण्यासाठी पाणाड्या, भूजल शोधक यंत्र, तांब्याची तार आदी साधनांचा वापर करतात. या काळात पाणी पातळी खालावलेली असल्याने अशा वेळेस पाणी लागले, तर ते कायम टिकते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. भूगर्भातील पाणी तपासण्यासाठी पाणाड्याला बोलविले जाते. पाणाडी ज्याठिकाणी पाणी उपलब्ध आहे, असे ठिकाण दाखवतो. शेतकरी त्याठिकाणी बोअर मारतात किंवा विहीर खुदाई करतात. भूगर्भातील पाणी दाखविण्यासाठी पाणाडी विविध मार्गांचा अवलंब करतात. पाणाड्यांच्या अंदाजानुसार काही ठिकाणी बोअर, विहिरीला भरघोस पाणी मिळते. मात्र, काही ठिकाणचा अंदाज चुकतो. बोअर कितीही खोल मारले किंवा विहिरीची कितीही खुदाई केली तरी पाणी लागत नाही. त्यामुळे ज्या पाणाड्याचा अंदाज अचूक त्या पाणाड्याला शेतकऱ्यांकडून जास्त सुपारी मिळते.सध्या मात्र नामांकित पाणाड्यांनाही सुपारी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. गत महिन्यापासून वारंवार पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ता बोअर मारले किंवा विहीर खोदली तर पाणी लागेल; पण ते पाणी टिकेल की नाही याविषयी शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे.शिवाय काही शेतकऱ्यांनी धाडसाने बोअर मारण्याचे ठरविले तरी बोअर मारणारे मशीन अवजड असल्याने सध्याच्या परिस्थितीत ते मशीन शेतात जाऊ शकत नाही. त्यामुळे विहीर व बोअर खुदाई करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गत वर्षाच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येत आहे. बोअर मशीनसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांना नंबर लावावे लागत होते. तशी यावर्षीची परिस्थिती नाही. पाणी दाखविणाऱ्या पाणाड्यांना मागणी कमी आहे.अंदाज अचूक, तर मागणीही जास्तजमिनीतील पाणी पातळी पाहत असताना ज्याठिकाणी पाणी आहे, त्याठिकाणी यंत्र पाणी दाखवते. तर नारळ हातावर उभा राहतो. वनस्पतीच्या लहान फोका उभ्या राहतात. त्यावर भूजल पातळीचा अंदाज येतो. ‘ओ पॉझिटिव्ह’ रक्तगट असणाऱ्या पाणाड्यांचे अंदाज अचूक ठरतात, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. याला शास्त्रीय आधार नसला तरी ग्रामीण भागातील शेतकरी अशाच पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा अंदाज घेतात. कधी-कधी हे अंदाज खोटे ठरतात. तर कधी अंदाजानुसार मुबलक पाणी मिळते. ज्या पाणाड्याचा अंदाज अचूक त्याला शेतकऱ्याकडून जास्त मागणी असते. संबंधित पाणाड्याचा पाणी पाहण्याचा दरही जास्त असतो.पाणाड्यांच्या पाणी पाहण्याच्या पद्धती १ भूगर्भातील पाणी पाहण्यासाठी अनेक पाणाडे भूजल शोधक यंत्र वापरतात. या यंत्राद्वारे भूगर्भातील पाणी अचूक शोधता येत असल्याचे संबंधित पाणाड्यांचे मत आहे. या यंत्राच्या साह्याने पाणी शोधण्यासाठी शेतकऱ्याकडून दोन हजारांपासून चार हजारांपर्यंत पैसे घेतले जातात.२काही पाणाडे तांब्याच्या तारा घेऊन ती ‘एल’ या इंग्रजी अक्षराप्रमाणे वाकवतात. ती तार आपल्यासमोर धरून ते शेतात चालतात. ज्याठिकाणी तार आपोआप पुन्हा सरळ होते, त्याठिकाणी पाणी आहे, असे पाणाड्याकडून सांगितले जाते. त्यासाठी पाणाड्या शेतकऱ्याकडून दोन-चार हजारांपर्यंत पैसे घेतो.३ सोन-तरवड झाडाच्या किंवा निरगुडीच्या फोका कमरेसोबत घेऊन काही पाणाडे पाणी शोधतात. या फोका कमरेसोबत घेऊन पाणाडे चालतात. ज्यावेळी या फोका सरळ होतील, त्यावेळी त्याठिकाणी पाणी असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. या पद्धतीने पाणी पाहण्यासाठी पाचशे ते एक हजार रुपये घेतले जातात.४शेंडीचा नारळ हातावर धरून पाणी पाहणारेही काही पाणाडे आहेत. त्यासाठी ते शेतकऱ्याकडून एक ते दीड हजार रूपये घेतात. तसेच कडुनिंबाच्या फोकांच्या साह्याने पाणी पाहण्यासाठी एक-दीड हजार रुपये घेतले जातात.५बोअर खुदाईसाठी प्रतिफुटासाठी ५२ रुपये एवढा खर्च येतो. तर केसिंग पाईपसाठी प्रतिफुटासाठी ३२० रुपये एवढा खर्च येतो. खोल-खोल पाणी...कऱ्हाडला बागायती क्षेत्रात १०० ते १५० फुटांपर्यंत बोअर खुदाई करावी लागते. कऱ्हाडला जिरायती क्षेत्रात २०० ते ३५० फुटांपर्यंत बोअर खुदाई करावी लागते. फलटण क्षेत्रात ४५० ते ६०० फुटांपर्यंत बोअर खुदाई करावी लागते. माण क्षेत्रात ७०० ते ९०० फुटांपर्यंत बोअर खुदाई करावी लागते. खटाव क्षेत्रात ६०० ते ७०० फुटांपर्यंत बोअर खुदाई करावी लागते. पाटण क्षेत्रात १५० ते ३५० फुटांपर्यंत बोअर खुदाई करावी लागते. गतवर्षी मार्च ते मे महिन्यांदरम्यान १९० बोअरचे पॉइंट दाखविण्यात आले. तर १४ विहिरींचा त्यात समावेश होता. यावर्षी मार्च व एप्रिल महिन्यांत १५ बोअरवेल तर २ विहिरींचे पॉइंट दाखविण्यात आले आहेत. यावर्षी आमच्या व्यवसायाला बऱ्याच प्रमाणात मंदी आहे. - प्रसाद लोहार, पाणाडी कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाडगतवर्षी मार्च ते जून महिन्यापर्यंत ४५० बोअरची खुदाई केली. यावर्षी मार्च व एप्रिल मध्ये १०० बोअरची खुदाई केली आहे. यावर्षी शेतकरी बोअर खुदाई करताना दिसुन येत नाहीत. त्यामुळे व्यवसायात सध्या बरीच मंदीआहे. - बापूराव जाधव, बोअर मालक, मलकापूरमहिन्याभरापासून वारंवार अवकाळी पाऊस पडत आहे आणि पावसाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यास भूगर्भातील मूळ पाण्याच्या पातळीचा अंदाज येत नाही. कडक उन्हाळ्यामध्ये बोअर मारणे गरजेचे असते. कारण तेच पाणी टिकावू असते. - सुनील पवार, शेतकरीवडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड
पाणाड्याला नाही सुपारी; बोअरवालेही उपाशी !
By admin | Updated: April 20, 2015 00:01 IST