इस्लामपूर : निवडणुकीच्या राजकारणातील महागुरु जयंत पाटील यांनी आपला सलग सहावा विजय शानदारपणे साजरा केला. इथली निवडणूक तशी निस्तेजच राहिली. त्यामुळे मतमोजणी केंद्रातील यंत्रणाही केवळ मतमोजणीची औपचारिकता पार पाडत होती. जयंतरावांच्या प्रत्येक फेरीतील निर्णायक आणि निर्विवाद आघाडीने इथे कसलाही ताण— तणाव नव्हता. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात इथली मतमोजणी झाली.सकाळी ८ वाजता येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीचा निकाल अवघ्या १५ मिनिटात बाहेर आला आणि जयंत पाटील यांनी पहिल्या फेरीतच ४ हजार ७२६ मतांची आघाडी घेतली. जयंत पाटील यांनी ६ फेऱ्यामंध्ये ४ हजार, तर चार फेऱ्यात ५ हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या अभिजित पाटील यांनी १५ फेऱ्यांमध्ये आपले दुसरे स्थान कायम ठेवले. काँग्रेसचे जितेंद्र पाटील पहिल्या सुरुवातीच्या पाच फेऱ्यात दुसऱ्या स्थानावर राहिल्याचे स्पष्ट झाले.जयंत पाटील यांच्या प्रत्येक फेरीतील वाढत्या मताधिक्यामुळे मतमोजणीचे कामही सुरळीतपणे झाले. चौथ्या फेरीत जितेंद्र पाटील यांनी जयंत पाटील यांचे मताधिक्य १ हजार ६५९ मतांवर आणले. या फेरीत जितेंद्र पाटील यांना मानणाऱ्या बोरगावसह परिसरातील गावांचा समावेश होता. तसेच अभिजित पाटील यांनी २0 व्या फेरीत मिरज मंडलातील गावांचा समावेश असलेल्या मतदान केंद्रावर चांगली मते मिळविल्याने जयंतरावांचे या फेरीतील मताधिक्य केवळ १ हजार २५ इतकेच राहिले. फक्त दोन फेऱ्यातच त्यांचे मताधिक्य हजाराच्या आसपास रोखण्यात विरोधी उमेदवारांना यश आले. (वार्ताहर)राज्यात भाजप लाटेचा राष्ट्रवादीला फटकाराज्याच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी आवश्यक ती भूमिका घेईल. प्रमुख पक्षांनी २८८ जागांवर उमेदवार उभा करुन आपापली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला. भाजप लाटेचा आमच्या पक्षाला फटका बसला आहे. जनतेचे माझ्यावर पूर्वीइतकेच प्रेम असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेवढे मताधिक्य जास्त, तेवढी जबाबदारी जास्त, हे ओळखून मतदारसंघाचा विकास करणार आहे.- जयंत पाटील, राष्ट्रवादी विजयी उमेदवार.प्रचारास वेळ मिळाला नाहीइस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात लाट होती. परंतु एकास एक उमेदवार देण्यात आम्ही अपयशी ठरलो. प्रचाराला पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळेच आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. जनतेचा कौल मान्य आहे. - अभिजित पाटील, अपक्ष उमेदवार.जनतेचा कौल मान्यपक्षाच्या आदेशाचा सन्मान ठेवून मी उमेदवारी स्वीकारली, लढलो. निवडणुकीत यश—अपयश हे ठरलेलेच आहे. येथून पुढे जे पक्षापासून दुरावलेले आहेत, त्यांना एकत्र करुन मतदारसंघात काँग्रेसला ताकद देणार आहे. -जितेंद्र पाटील, काँग्रेस उमेदवार.
जयंत पाटील यांची प्रत्येक फेरीत आघाडी
By admin | Updated: October 20, 2014 00:40 IST