भागवत काटकर - शेगाव विस्ताराने सर्वात मोठ्या असणाऱ्या जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पावसाअभावी चाऱ्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. पाण्याच्या टंचाईबरोबरच पशुधन जगविण्यासाठी चाऱ्याच्या टंचाईचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. जनावरांना चाऱ्यासाठी ज्वारीचा कडबा २००० रुपये प्रति शेकडा, तर उसाचा चारा २५०० ते २८०० रुपये प्रति टन या दराने जनावरांना चारा म्हणून खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी चारा छावण्या दुष्काळी भागात सुरू करण्याची घोषणा केली आहे. चारा छावण्या सुरू होण्याच्या कालावधीचा विचार करता, शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचीही मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.जत तालुक्यात एकूण जनावरांची संख्या २०१२ च्या पशुगणनेनुसार ६ लाख १० हजार ६०५ आहे. मात्र पशुवैद्यकीय जाणकारांच्यामते जनावरांच्या संख्येत दोन वर्षात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये गाई, बैल, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या यांचा समावेश आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध पशुधनाची जोड दिली आहे. या पशुपालनातून शेतकऱ्यांना दूध, बैल, खोंड, बोकड यांच्या विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळते. शिवाय शेणखताचा वापर शेतीसाठी शेतकरी करतो. पशुधनातून तालुक्यात दररोज लाखो लिटर दूध संकलन होत आहे. मात्र चाऱ्याचे वाढते दर व पाणीटंचाईमुळे जनावरे जगवायची कशी? या काळजीत शेतकरी आहेत. खरिपाचे एकूण क्षेत्र ६५ हजार ७० हेक्टर आहे. यापैकी केवळ २३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र या पेरण्या पावसाअभावी पूर्णत: वाया गेल्या आहेत. आता महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी चारा छावण्या सुरू करण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. राजारामबापू साखर कारखान्याच्यावतीने बनाळी येथे जिल्हा परिषद सदस्य संजीव सावंत यांच्या संस्थेने छावणी सुरू केली होती. त्या संस्थेची १७ लाख रुपये, शेगाव येथील श्रीकृष्ण पतसंस्थेची नऊ लाख, तर वाळेखिंडी विकास संस्थेची १४ लाख रुपये थकबाकी आहे. छावणी सुरू करताना जाचक अटी व नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. त्यावेळी छावणी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत नव्याने चारा छावण्या सुरू होणार का, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. त्यातूनही काही संस्थांनी जत तहसील विभागाकडे चारा छावणीविषयी विचारणा केली आहे. महसूलमंत्र्यांनी पाण्याची सोय व चारा छावण्या सुरू करण्याची घोषणा केली असली तरी, अद्याप तशी सूचना महसूल यंत्रणेकडे आलेली नाही.यापूर्वीची बिले अद्याप थकितजत तालुक्यातील काही चारा छावणी चालकांची बिले अद्यापही शासनाकडून मिळायची आहेत. तसेच काही संस्थांचे लेखापरीक्षण होणे बाकी आहे. यामुळे ही बिले प्रलंबित आहेत. जत उत्तर भागातील तीन ठिकाणच्या चारा छावण्यांची बिले थकली आहेत. छावणी चालकांना यापूर्वी छावणी चालविताना आलेला अनुभव पाहता, ते चारा छावणी सुरू करतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायासाठी जिवापाड जोपासलेल्या जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या पाणी व चाराटंचाई याची मोठी समस्या तालुक्यात निर्माण झाली आहे. तरीही चारा छावण्यांसंदर्भात शासनाने त्वरित निर्णय घेऊन, जाचक अटी व बिलांसंदर्भातील चालढकलीचे धोरण जाहीर करावे. अद्यापही जत उत्तर भागातील सुमारे ६० ते ७५ लाखांची बिले थकित आहेत, तरीही चारा छावण्या सुरू करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत.- संजीव सावंत, जि. प. सदस्य, बनाळी, ता. जत.दुष्काळी भागातील जनावरे जगली पाहिजेत, ही आमची तळमळ आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी जनावरांची जोपासना केली. पण सध्या दुष्काळाची दाहकता वाढतच आहे. चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे, मात्र चारा छावणी चालविताना अडचणी निर्माण होतात. शिवाय शंभर टक्के सुुविधा छावणीत मिळत नाहीत. त्यासाठी सरळ थेट अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाकडे पुढाकार घेऊ.- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
जत तालुक्यात जनावरे जगवायची कशी?
By admin | Updated: August 18, 2015 22:45 IST