आष्टा : मर्दवाडी (ता. वाळवा) येथील ५२ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेवर सोमवारी दुपारी आष्टा येथील अमरधाम स्मशानभूमीतील गॅस दाहिनी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे व नगराध्यक्षा स्नेहा माळी यांनी गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार केले.
मर्दवाडी येथील ५२ वर्षीय महिलेवर कोरोनाबाबत उपचार सुरू होते. मात्र तिचे निधन झाले. तिच्यावर आष्टा येथील मर्दवाडी रस्त्यावरील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांना माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले. महिलेला कोरोना झाला असल्याने दहन करण्यास कोण पुढे येणार अशी चर्चा चालू होती. मात्र दहन करण्यासाठी शिंदे पुढे सरसावले. त्यांच्यासमवेत नगराध्यक्ष स्नेहा माळी याही दहन करण्यासाठी तयार झाल्या. शिंदे व माळी यांनी पुढाकार घेऊन कोरोनाबाधित महिलेवर गॅस दाहिनीमध्ये अग्निसंस्कार केले.